Nashik Leopard News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना कमी झाल्या असल्या तरीही मात्र बिबट्याला अनेक भागातून रेस्क्यू करण्यात येत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील दहिवडी येथे तारेच्या कुंपणात अडकल्याने अडीच वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तर एका मादीला शिंदे गाव परिसरात रेस्क्यू करण्यात आले आहे. 


नाशिक शहरासह जिल्हाभरात (Nashik District) बिबट्या वावर (Leopard Rescue) नित्याचा झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कधी शेतात तर झोपडीत तर कधी ऊसाच्या शेतात बिबटे आढळून येत असल्याने बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी अनेक भागात पिंजरे लावण्यात येत आहेत. अशातच नाशिक-पुणे महामार्गालगत बंगालाबाबा, कारखाना रोडवरील शिंदे गावातील शशिकांत जाधव यांच्या फार्ममध्ये बिबट्याने रात्री कोंबड्यांचा फडशा पाडला. त्याच मादी बिबट्याने परिसरात दहशत निर्माण केली होती. जाधव आणि इतर रहिवाशांच्या मागणीवरुन वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. सावज टिपण्यासाठी बिबट्या मादी आली असता पिंजऱ्यात अडकली. 


दरम्यान बिबट मादी पिंजऱ्यात अडकल्यानंतर पहाटेच्या सुमारास पिंजऱ्याच्या दिशेने मोठमोठ्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. स्थानिक नागरिकांनी तिकडे धाव घेतली असता दोन ते तीन वर्षांची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले. नागरिकांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोविंद पंढरी आणि अशोक खानझोडे यांनी बिबट्याला रोपवाटिकेत वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. दरम्यान बिबट्या रेस्क्यू करण्यात आल्याने परिसरात नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 


तारेच्या कुंपणात अडकून मादी बिबट्याचा मृत्यू


बिबट्याच्या पोटाला तारेचा वेढा पडल्याने मोठी जखम झाली होती. दरम्यान, वनविभागाला माहिती घटनास्थळी येण्यास उशीर केल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दहिवडी येथील रामभाऊ बर्के यांच्या मक्याच्या शेतात बिबट्याची मादी पोटाला जखम झाल्याच्या अवस्थेत आढळली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता. पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग, सहायक वनसंरक्षक पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुजित 'बोकडे, वत्सला कांगणे, मधुकर शिंदे, बालम शेख, रोहित लोणारे यांनी घटनास्थळाहून मृत बिबट्या ताब्यात घेतला. 


दरम्यान मोहदरी वनउद्यानात आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करत तेथेच दफनविधी करण्यात आला. बिबट्याच्या पूर्ण पोटाला मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने रक्तस्राव झाला होता. एखाद्या तारेच्या कुंपणाला अडकून त्यात बिबट्याचे पोट फाटून तो जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात बिबट्याच्या पोटातील आतडे बाहेर पडले होते. रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याच्या मादीचा मृत्यू झाला.