Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत धान्य वाटप प्रक्रिया सुरू असताना नाशिकरोड (Nashikroad) येथील गोदाम धान्य (Seed) उचलीकरिता बंद करण्याची सूचना भारतीय खाद्य निगम, भारतीय अन्न महामंडळ क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत देण्यात आली होती. याबाबत तात्काळ दखल घेवून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पीयूष गोयल यांना लेखी निवेदन देत नाशिकरोड येथील गोदामास  धान्य उचलीकरिता मुदतवाढ देण्याची मागणी केली असता, गोयल यांनी नाशिकरोड येथील धान्य गोदाम चालू ठेवण्यास तात्काळ मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Anna Yojana) मार्च, 2020 पासून सुरू करण्यात आली असून  केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेस अनेक वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली  आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी लागणारे धान्य भारतीय खाद्य निगम मार्फत मनमाड व नाशिकरोड येथील धान्य गोदामामार्फत पुरविले जाते. सद्यस्थितीत नियमित धान्य योजने सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्याचे वाटप सुरू असून जवळपास दुप्पट धान्याची दरमहा उचल केली जात आहे. या उचलीमध्ये मनमाड येथून 55 टक्के व नाशिकरोड येथून 44 टक्के धान्याची उचल केली जाते. 


दरम्यानच्या कालावधीत भारतीय खाद्य निगमने नाशिकरोड  गोदाम बंद करून सर्व धान्य मनमाड येथून उचल करण्याबाबत कळविले होते. संपूर्ण जिल्ह्याचे धान्य मनमाड येथून उचलणे अशक्य असल्यामुळे या प्रणालीचे लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासाठी  डॉ. भारती  पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालून केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री  यांच्याशी तात्काळ संपर्क साधून नाशिकरोड येथील धान्य गोदाम चालू ठेवण्यास तात्काळ मंजुरी मिळवून दिली असल्याने  नाशिक जिल्ह्यातील धान्य उचलीचा प्रश्न निकाली निघाला आहे.नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या नियतनानुसार धान्य उचलीकरिता केंद्रीय भंडारण निगम (CWC) नाशिकरोड येथुन नियमित धान्याची उचल मिळणेबाबत तसेच व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धान्याची उचल सुरळीत राहण्याच्या दृष्टीने  धान्याची उचल करण्यास डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत मुंबई बोरीवलीच्या भारतीय अन्न महामंडळाचे व्यवस्थापक यांना केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी आदेश दिले आहेत.


वाहतुकीस अधिकचा कालावधी व खर्चामुळे... 
नाशिक जिल्ह्यात 15 तालुके व 2 धान्य वितरण अधिकारी कार्यक्षेत्र असे एकूण 17 कार्यक्षेत्राचे कामकाज करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे 18 हजार 500 मेट्रीक टन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मासिक नियतन 20 हजार 300 मेट्रीक टन असुन दरमहा धान्याची उचल करण्यात येते. केंद्रीय भंडारण निगम CWC नाशिकरोड (गोदाम क्षमता 7 हजार 770 मेट्रीक टन) येथून धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यक्षेत्राकरिता थेट वाहतुकीव्दारे, तर नाशिक तालुका, सिन्नर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर या 8 गोदामाकरिता धान्याची उचल करण्यात येते. उर्वरीत मालेगाव नांदगाव, मनमाड गोदाम, येवला, देवळा, बागलाण, कळवण, निफाड व चांदवड या गोदामाकरिता एफ. सी. आय. मनमाड येथुन धान्याची वाहतुक करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या एकूण आवश्यक अन्नधान्यापैकी 45 टक्के (म्हणजे सुमारे 9 हजार 500 मेट्रीक टन) केंद्रीय खार महामंडळाच्या नाशिकरोड येथुन तर उर्वरीत 55 टक्के (म्हणजे सुमारे 11500 मेट्रीक टन) धान्याची उचल एफ. सी. आय. मनमाड या डेपोमधुन करण्यात येते होती. त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धान्याच्या उचलीस मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहे. तसेच  जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार विचारात घेता भंडारण निगम (CWC) नाशिकरोड गोदामाला जोडण्यात आलेल्या सर्व तालुका गोदामांकरिता धान्य वाहतुक मनमाड येथुन केल्यास वाहतुकीस अधिकचा कालावधी व अतिरिक्त वाहतुक खर्च वाढणार असल्याची बाब जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांनी डॉ. पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती.