SC Issued Notice to Jitendra Awhad : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनंत करमुसे (Anant Karmuse) यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनंतराव करमुसे यांची याचिका स्वीकारली असून या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. ठाणे शहर पोलीस आव्हाड यांच्याशी हातमिळवणी करत असल्याचा यात आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अशी मागणी याचिकाकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. 


 






 



25 नोव्हेंबर रोजी सुनावणी


अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.



नेमकं प्रकरण काय?


घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले होते. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती.पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.