Nashik NMC : नाशिक (Nashik) महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. घरावर कुठलेही मोबाईल टॉवर (Mobile Tower) नसतांना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला मोबाईल टॉवरच्या थकबाकीपोटी पालिकेने पाठवले तब्बल 13 लाख 25 हजारांचे बिल पाठवण्यात आले आहे. माजी नगरसेवकासोबतच असा प्रकार घडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. 


गेल्या काही महिन्यापासून नाशिक महापालिकेकडून (Nashik NMC) थकबाकी वसूल करण्यासाठी विविध मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत तर थकबाकी दारांच्या घरापुढे जात ढोल वादन करण्यात येत आहे. साहजिकच आहे की, एखाद्या घराची घरपट्टी थकली की प्रशासनकडून नोटीस पाठविण्यात येते. मात्र घर आपले नसताना लाखो रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस आली तर घरमालक चक्रावून जाईल, असाच काहीसा प्रकार नाशिक शहरातील  चुंचाळे परिसरातील माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या सोबत घडला प्रकार आहे.  पैसे न भरल्यास मिळकत जप्त करण्याचीही नोटीस महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. 


नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना त्यांच्या मिळकतीवर मोबाईल टॉवर नसताना चक्क या टॉवरच्या थकबाकी पोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. ती रक्कम न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. यामुळे माजी नगरसेवक आरोटे यांना धक्का बसला असून त्यांनी प्रशासनाला विचारणा केली असता, महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याकडूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे आरोटे यांनी सांगितले. तर महालिकेतील संबंधित घटनेबाबत विचारणा केली असता कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचे निदर्शनास आले. 


दरम्यान महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी वेगवेगळे प्रयोग सुरू केले असून सद्यस्थितीत ढोल बजाव आंदोलन थकबाकीदारांच्या घरासमोर सुरू आहे. त्याचबरोबर घरपट्टी संदर्भात सॉफ्टवेअर तयार केले असून त्यात इंडेक्स नंबर आणि अन्य तपशील दिलेला आहे. तसेच काही दिवसांपासून तर थेट टेक्स्ट मॅसेज व व्हाट्सअप वरही मेसेज देण्याचा फंडा सुरु करण्यात आला आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी चुंचाळे येथील माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना महापालिकेने त्यांच्या मिळकतीवर असलेल्या मोबाईल टॉवरची भरपाई करण्यासाठी नोटीस बजावली असून 13 लाख 25 हजार 808 रुपये भरण्यास सांगितले आहे. ही रक्कम न भरल्यास मिळकत जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


घरावर टॉवरच नाही... 


भागवत आरोटे यांना महापालिकेने घरपट्टी थकबाकी असल्याची  नोटीस बजावल्यानंतर महापालिकेने त्यांची मिळकत तर शोधली. मात्र त्यावर टॉवरच नसल्याचे वास्तव समोर आले. चुंचाळे येथील घर आणि कार्यालय सोडले तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मिळकत नाही, मिळकतीवर टॉवरही दाखवल्याने आरोटे यांना धक्का बसला आहे. त्यांनी सिडकोचे विभागीय कार्यालय तसेच महापालिकेतही चौकशी केली. मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे आरोटे म्हणाले. एकूणच या सर्व महापालिकेच्या गोंधळामुळे माजी नगरसेवक आरोटे यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.