Malegaon News : नाशिकच्या (Nashik) मालेगावमध्ये एका अठरा वर्षीय मुलाचे अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या 24 तासांत या घटनेतील अपहरण झालेल्या तरुणाची सुखरुप सुटका केली आहे..या संशयितांकडून कोयता, गावठी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. घटनेतील खंडणी मागणाऱ्यापैकी एक संशयित अद्याप फरार आहे.


मालेगाव शहरातील गजबजलेल्या मालेगाव (Malegaon) कॅम्पातील डी. के. कॉर्नर येथील युवकाचे अपहरण (Youth Kidnapped) करुन 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरातील एकास पोलिसांच्या पथकाने चोवीस तासांत शिताफीने ताब्यात घेतले असून, अन्य एकजण फरार झाला आहे. दरम्यान, अपहृत मुलास सुरक्षितरित्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्यात अजूनही काही व्यक्ती असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यासंदर्भात मालेगाव परिसरातील सोयगाव आनंद वाल्मीक कापडे यांनी कॅम्प पोलिसांत (Malegaon Police) फिर्याद दिली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डी. के. कॉर्नर येथून सुबोध सुजित कापडे या 18 वर्षीय युवकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण करुन त्यास डांबून ठेवले. त्यानंतर संशयितांनी 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास त्या युवकास मारुन टाकू, अशी धमकी दिली. 


या तरुणाच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत याबाबत कॅम्प पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ तीन तपास पथके तयार करुन यंत्रणा फिरविली. अपहरणकर्त्याला जुना आग्रा रोडवरील एका हॉटेलवर खंडणी घेण्यासाठी बोलवून आधीच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. तर एक जण तिथून फरार झाला. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून अपहरणासाठी वापरण्यात आलेला कोयता, गावठी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. विशेष म्हणजे पोलिसांनी 24 तांसात या गुन्ह्याची उकल केली. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या खंडणी प्रकरणात काही नवीन ट्विस्ट मिळतो का? हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.


संशयितास 24 तासांत अटक 


याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपअधीक्षक तेजवीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, कॅम्प पोलिस स्टेशन व फिरते पोलिस पथक या तीन पथकांनी कसून चौकशी करीत 24  तासांच्या दोन खंडणी- खोरांना पकडले; त्यातील एक पोलिसांच्या हातून निसटला. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एक संशयित पोलिसांच्या हातून निसटला. दरम्यान तपास पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सागर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक शरद मोगल, विजय वाघ, नयन परदेशी, दत्ता माळी, चंद्रकांत कदम, गौतम बोराडे, मनीषा पवार यांचा समावेश होता. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून खंडणीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.


हेही वाचा


Hindu Jan Akrosh Morcha Malegaon : मालेगावात हिंदू जन आक्रोश मोर्चा, आमदार Niteh Rane यांचा सहभाग