Nashik Ramzan Eid : बांगड्या, रंगीत शेवया, पठाणी ड्रेस, विविध खाद्य पदार्थांसह बच्चे कंपनीची लगबग नाशिकच्या (Nashik) बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. निमित्त म्हणजे मुस्लीम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद (Ramzan Eid) हा सण अवघ्या काही तासांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच शहरातील दुधबाजार, मेनरोड, शालिमार (Shalimar) आदी परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुस्लिम बांधवांसाठी सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असल्याने बाजारपेठेत मिठाई, सुका मेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईद साजरी केली जाते. मुस्लिम बांधवांकडून महिनाभर केलेला उपवास रोजा ईदच्या दिवशी सुटत असतो. मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. शिरखुर्मा गोड (Shirkhurma) पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नवीन कपडे, शिरखुर्मासाठी लागणारे पदार्थ तसेच अन्य विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान, रमजान महिना सुरू होताच बाजारपेठेत दुकाने महिनाभर विविध खाद्यपदार्थ, साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी फुलल्याचे दिसून येते. महिनाभर शीतपेय, सरबत, मिठाई आणि फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी या दुकानावर दिसत आहे. या महिन्यातील तीन टप्प्यांपैकी एकेक टप्पा संपताना ईदच्या खरेदीवर ग्राहकांचा जोर वाढला आहे. पहिल्या दहा दिवसात रोजा पाळणारे मुस्लीम बांधव केवळ इफ्तार (Iftar) आणि सहरीचे पदार्थ खरेदी करताना दिसतात तर दुसऱ्या दहा दिवसात ईदसाठी नवे कपडे खरेदीवर जोर दिसतो. तर अवघ्या काही तासांवर रमजान ईदचा सण आलं असून मिठाईचे पदार्थ, कपड्यांच्या खरेदीसाठी नाशिकच्या बाजारपेठांत मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.
नाशिकच्या बाजाराला चार चांद
ईदनिमित्तच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली असून खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे कपडे, टोप्या, सूट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुलांचे कपडे, बांगड्या, रंगीत शेवया, पठाणी ड्रेस, विविध खाद्य पदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली आहे. काचेचे ग्लास, कटोरे यांचे विविध आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ईदनिमित्त रंगीबेरंगी शेवयांनाही मागणी वाढली आहे. मेंदी, बांगड्या, सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात तसेच मुलांसाठी कपडे तसेच पादत्राणांच्या दुकानातही मोठी गर्दी बघायला मिळत आहे.