Nashik Onion Price Issue : या सरकारच करायचं काय? खाली डोकं वरती पाय', केंद्र सरकार हाय हाय, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी चांदवड परिसर दणाणून गेला. कांदा दरावरुन चांगलेच रान पेटले असून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये (Chandwad) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरून नाशिकसह (Nashik) राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अशातच विधानभवनात कांदा प्रश्नावरुन (Onions Issue) विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र अद्यापही कांद्याबाबतची परिस्थिती जैसे थे आहे. अशातच विरोधी पक्षांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप सरकारने (BJP Government) मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान अडीच हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (Rashtravdi Congress) केली आहे.
कांद्याला किमान 2500 रुपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अक्षरश कांदा रस्त्यावर फेकून देण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान 2500 रुपये हमीभाव जाहीर करावा. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ तसंच घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कांद्याचे दर, द्राक्षाचे पडलेले दर, वाढती महागाई या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
फडणवीसांचे आश्वासन हवेत विरलं की काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन देऊन सहा दिवस उलटून गेले. तरही अद्याप बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.