Dada Bhuse : मुख्यमंत्री पूजेला गेले होते होते हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे काल शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक त्यांनी ताफा सिन्नरकडे (Sinnar) वळवला. त्यानंतर सिन्नरजवळील ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी भेट दिली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला हवं, असे म्हटले आहे.
आज नाशिकमध्ये (Nashik) ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डीला गेले होते. यावेळी त्यांनी सपत्नीक साई मंदिरात पाद्यपूजा केली. तसंच त्यांच्या हस्ते आरती देखील झाली. शिर्डीहून मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक सिन्नरकडे वळला. सिन्नर तालुक्यातील श्री ईशान्येश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्याचबरोबर सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या भेटीनंतर चर्चाना उधाण आले आहे. यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचे ते म्हणाले.
ते यावेळी म्हणाले कि, शिर्डीहून मुख्यमंत्री हे सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी पूजा केल्यानंतर ते माघारी फिरले. त्यामुळे हात दाखविण्याचा प्रकार झालेला नाही. त्यांनतर मालेगाव शहरात गोवराचे संशयित रुग्ण आढळले, यावर ते म्हणाले कि, मालेगावात काही लहान बालकांना गोवरचे डोस दिले नसल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्याचे आदेश दिले असून लसीकरण जनजागृती मोहिमेत काही धार्मिक गुरूंनाही सहभागी करून घेणार आहोत. तसेच त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी येथील अधरतीर्थ आश्रमातील चार वर्षीय मुलाचा खून आल्याची घटना घटना घडली. या मुलाच्या झालेल्या हत्येच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे भुसेंनी सांगितले.
तसेच जिल्हयात शिंदे गटात धुसफूस सुरु असल्याच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा दादा भुसे यांनी गुगली टाकत आम्ही सर्व सोबत असल्याचे सांगितले. आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही, आमदार सुहास कांदे आणि आम्ही कालही सोबत होतो. तर दुसरीकडे हेमंत गोडसे या भागातले लोकप्रतिनिधी असून या भागातील मुद्द्यांवर दाद मागण्यासाठी त्यांनी वेळ मागितली असेल, यानुसार ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असतील, त्यामुळे वाद असण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत त्यांनी हा विषय बाजूला केला. तसेच संजय राऊतांवर ते म्हणाले कि, कालपर्यंत आम्ही होतो तेव्हा खूप चांगले होतो आणि आज अचानक वाईट झालो, मात्र काल जसे सोबत होत, तसेच आजही सोबत आहोत.
खूप कष्टाने आपण महाराष्ट्र मिळवलाय...
महाराष्ट्र -कर्नाटक वादावर भुसे म्हणाले कि, महाराष्ट्राचे नागरिक ही गोष्ट मुळीच सहन करणार नाही. जबाबदार लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे अपेक्षित नाही. विदर्भ, मराठवाडा वेगळं कुणाच्या मनात असेल असं वाटत नाही. खूप कष्टाने आपण महाराष्ट्र मिळवलाय असून यासाठी 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. त्यामुळे अशी मागणी कुणीही करणार नसल्याचे ते म्हणाले.