Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून कांद्याला भावच मिळत नसल्यानं उत्पादन खर्चही  भरून निघत नाहीय. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला बाजारातील इतर घटकांबरोबरच पाकिस्तान श्रीलंकामधील आर्थिक दिवाळखोरीही जबाबदार असल्याचं मत व्यक्त होत आहे. 

Continues below advertisement

नाशिक (Nashik) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांच्या हिरमुसलेले चेहेरे बाजारातील उलाढालीची साक्ष देत आहेत. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव (Onion rate) मिळत नसल्यानं 70-75  किलोमीटरचे अंतर पार करून  हे शेतकरी नाशिक कृषी उत्पन्न (Nashik bjar samiti) बाजार समितीत मोठ्या अपेक्षेनं आलेत. मात्र त्यांची अपेक्षा फोल ठरली. इथेही त्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही. ही परिस्थिती केवळ नाशिक आणि चांदवड (Chandwad) तालुक्यातील बाजार समितीतील नाही तर जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कांद्याला भाव मिळत नाही. सरासरी चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा  विक्री होत असून उत्पादन आणि दळणवळण खर्चही भरून निघत नाही.  गेल्या एक महिन्यापासून साधारणतः अशीच परीस्थिती आहे. आधीच अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे यंदा लाल कांद्याची लागवड उशिरा झाली. आता कुठे शेतकऱ्यांचा माल बाजारात येतोय तर मागणीच कमी झालीय. दक्षिणेसह गुजरात, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात स्थानिक पीक आल्यानं नाशिकच्या कांद्याला मागणीच नाही. लाल कांदा नाशवंत आहे, लवकर खराब होत असल्यानं आहे त्या भावात कांदा विकणे किंवा फेकून देणे एवढाच पर्याय शेतकऱ्यांसमोर असल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Continues below advertisement

दरम्यान पाकिस्तानमध्ये थेट निर्यात होत नव्हती. मात्र इतर मार्गाने होणारी निर्यातही पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थिमुळे ठप्प झाली आहे. तीच परिस्थिती श्रीलंकेची आहे. बांग्लादेशातही कांद्याची मागणी नाही. एकीकडे देशांतर्गत मागणी घटली, मलेशिया, व्हिएतनाम व्यतिरिक्त इतर देशातील निर्यात मंदावली आहे. दुसरीकडे कांद्याचे उत्पादन वाढल्यानं कांद्याचा प्रश्न निर्माण  झाला असून जो पर्यंत लाल कांदा आहे. तोपर्यंत साधारणपणे पुढील दोन महिने तरी कांदा कांद्याचे भाव सहाशे ते आठशेच्या पुढे जाणार नसल्याचा दावा व्यापारी करत आहेत. 

सरकार पातळीवरही कांद्या उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणायचा प्रयत्न केला जात असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधून नाफेडच्या माध्यमातून पुन्हा कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे. शेजारील देशामध्ये आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं नाफेडने कांदा खरेदी करावा हा एकमेव पर्याय समोर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मागील आठवड्यात चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. येवल्यात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. येत्या काळातही अशीच आंदोलने होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपये हमीभाव द्यावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करत असून जनतेचं सर्वसामान्यांचे शेतकऱ्याचे सरकार असल्याची भाषण करणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ काय निर्णय घेते. शेतकऱ्यांना कसा दिलासा देते. याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्याच्या नजरा लागल्या आहेत.

कांदा अग्निडाग समारंभ... 

दरम्यान कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे.  यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रण दिले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल जवळील मातुलठाण या गावी समारंभाचे ठिकाण आहे. सदर कार्यक्रमाच्या जाहीर निमंत्रण पत्रिका छापल्या असून सोशल मिडीयावर सध्या व्‍हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षापुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा डोंगरे यांनी कांद्याचे शेत जाळून टाकलं होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नगरसुल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती.