Nashik News : गेल्या काही महिन्यांपासून कांदा दरात (Onion Rate) सातत्याने घसरण होत असून रात्रीचा दिवस करून पिकवलेला कांदा मात्र कवडीमोल भावात विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे. वारंवार होणारी कांदा दरातील घसरण सरकारला दिसत नाही का? केंद्रीय पथक, अभ्यास गट कुठं आहे? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. 


नाशिकची (Nashik) मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीत सोमवारी शेतकऱ्यांनी आंदोलन (Protest) केले. त्याचबरोबर सातत्याने होत असलेली कांदा दरातील घसरण थांबावी यासाठी लिलाव बंद पाडत सरकारला जाब विचारला. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने लासलगाव सह परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव रोखून संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकार राज्य सरकार व नाफेडच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. पुढील दोन-चार दिवसात दरात सुधारणा न झाल्यास राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखले जातील मुंबईत मंत्रालयासमोर कांदा ओतून आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2019 मध्ये 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट न होता खर्च दुप्पट झाला आणि उत्पन्न निम्मे झाल्याचे दिघोळे यांनी सांगितले. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो ला 22 ते 25 रुपये येतो. पण यावर्षी त्यास कवडीमोल दर मिळत असल्याने  दिवसागणिक कोट्यावधींचे नुकसान होत आहे. हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा, तसेच काही महिन्यांपासून ज्यांनी आपला कांदा कमी दरात विकलेला आहे. त्यांना दहा रुपये प्रति किलो याप्रमाणे नुकसान भरपाई अनुदान द्यावी, अशी मागणी करण्यात आली. उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा तसेच नाफेडने मागील काळात अल्प दरात खरेदी केलेला कांदा आता बाजारात आणून दर पाडत असल्याची तक्रार करीत शेतकऱ्यांनी नाफेडचाही निषेध केला.


शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप
दिवाळीनंतर कांद्याचे दर वधारतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार दरही कडाडले होते. तीन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात कांद्याच्या दराने 35 रुपयांचा दर गाठला होता. त्यामुळे पुढील कालावधीत कांद्याचे दर अंतिम वदण्याची शक्यता वर्तवण्यात होती. मात्र त्यानंतर बाजारात अचानकपणे कांद्याचे दर गडगडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरून होत आहे. त्यामुळे संतावरणावर झालेल्या शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव लासलगावी बंद पाडला. शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढत असताना तात्काळ एका रात्रीत निर्यातबंदी करून परदेशी कांदा आयात करणाऱ्या केंद्र सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर पडले. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने राज्य व केंद्र सरकारच्या बद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झालेली आहे. कांदा उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करावा तसेच नाफेडने मागील काळात अल्प दरात शेतकरी कांदा खरेदी करून तोच कांदा पुन्हा आता बाजारात आणून शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पाडले आहे.