नाशिक : मी नाराज नाही, आज देखील सकाळी बैठक घेतली. ध्वजारोहण (15 August) संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतात. उद्या मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी काश्मीरला (Kashmir) जाऊन देखील ध्वजारोहण करेन, असे वक्तव्य पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासंदर्भात अनेक वाद विवाद झाले. त्यावरून राजकारण तापले होते, मात्र दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्पष्टीकरण देत विषयावर पडदा टाकला आहे. 


आज पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे नाशिक शहरात होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सुरवातीलाच राज्यातील उद्या संपन्न होत असलेल्या ध्वजारोहणासंदर्भात अनेक मंत्र्यांना ध्वजारोहण करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार नाशिकला गिरीश महाजन (Girish Mahajan), धुळ्याला दादा भुसे तर अमरावतीला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ध्वजारोहण करतील, अशी यादीच जाहीर करण्यात आली होती. मात्र यावरून वाद सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिले होते. त्यावर आज दादा भुसे म्हणाले की, ध्वजारोहण संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतात. उद्या मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी काश्मीरला जाऊन देखील ध्वजारोहण करेन, असे वक्तव्य पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.


दादा भुसे पुढे म्हणाले की, कृषी विभागाची आज बैठक झाली,आतापर्यंत 65 टक्के पाऊस झाला आहे. सिन्नर (Sinnar) आणि जिल्ह्यातील इतर काही गावांमध्ये पेरणी झाली नाही. चिंता वाटावी अशी पिकांची परिस्थिती आहे. आगामी काळात तालुका निहाय बैठक घेणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी 56 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. काही धरणात पाणी आहे तर काही धरणात 30 ते 35 टक्के पाणीसाठा आहे. शेती, पिण्यासाठी आणि उद्योगासाठी आगामी काळात नियोजन करावे लागेल, असे ते म्हणाले. तर कांदा (onion Farmers) दरावरून शेतकऱ्यांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे. यावर ते म्हणाले की, कांद्याला कमी दर मिळत असल्याने अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. लवकरच अनुदान शेतकऱ्यांचे खात्यात वर्ग होतील, कांद्याचे दर कोसळले असताना नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यात आले होते. आता कांद्याला चांगले दर मिळत आहे. खरेदी केलेला कांदा नाफेड ने बाजारात आणु नये, अशी शेतकरी संघटनांची इच्छा असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करेन, असे आश्वासन दिले. 


आम्ही मर्यादा सोडली तर.... 


तसेच मुख्यमंत्री नाराज नाहीत, 24 तासात ते 18 ते 20 तास काम करतात. किमान 5 ते 6 तास शरीराला झोपेची आवशकता असते. मात्र मुख्यमंत्री रात्रंदिवस कामच करत असतात. अशावेळी आम्हीच खासगीत त्यांना आराम करण्यासाठी सांगत असतो. मात्र ते पुन्हा सकाळी 4 ते 5 पर्यंत ते काम करत असतात. सध्या 2 दिवस ते आराम करण्यासाठी त्यांच्या शेतात गेले आहेत. मात्र तिथून देखील ते काम करत होते. तर आजच्या सामानातून राष्ट्रवादीसह एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पंतप्रधान भेटले. त्यांना शाबासकीची थाप दिली. अमित शहा यांच्या घरात देखील मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाले आहे. मात्र दुसरीकडे राज्यातल्या जनतेचे दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टीका करताना मर्यादा सोडू नका नाहीतर आम्ही देखील सोडू, असा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. तसेच अजित पवार आणि शरद पवार भेटीवर सामनातून टीका करण्यात आली आहे. यावर ते म्हणाले की, संजय राऊत भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी शरद पवार यांची करतात, अशी जहरी टीकाही भुसे यांनी यावेळी केली. 


इतर संबंधित बातमी : 


Nashik news : पंधरा दिवसांत नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, पालकमंत्री दादा भुसे यांचा मनपाला अल्टिमेटम