Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) अजिंठा गावातील आठवडा बाजारात रविवारी तरुणांच्या हुल्लडबाजीनंतर दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेनंतर बाजारात आणि परिसरात अफवा पसरल्याने गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, याची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच बाजारात धाव घेतल्याने मोठी अनर्थ टळला. तर पोलिसांनी बाजारात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. 


रविवार रोजी अजिंठा गावातील आठवडा बाजारात बाळापुर येथील दोन टवाळखोर युवकांनी येवुन बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिला, युवती, यांचा पाठलाग करत असल्याबाबत अजिंठा गावातील काही स्थानिक युवकांना संशय आला. त्यांनी या संशयावरून बाहेरून आलेल्या त्या दोन मुलांची चौकशी केली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची होवुन दोन्ही गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली होती. यामुळे अजिंठा येथील गांधी चौक परिसरात गोंधळ निर्माण होवुन हे तरूण आपसात भिडल्याने बघणाऱ्यांचा मोठया प्रमाणावर जमाव जमला होता. त्यात बाजार असल्याने बाजारात अफवा पसरली आणि लोकांचा गोंधळ उडाला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. 


दरम्यान, याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात माहिती मिळताच स.पो.नि. प्रमोद भिंगारे यांनी घटनास्थळी धाव घेवुन भरचौकात सार्वजनिक ठिकाणी गोधंळ घालुन भांडण करणाऱ्या तरूणांना लागलीच ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलीस ठाणे अजिंठा येथे आणले. त्यांची कसुन चौकशी करता त्यांच्यात संशयाचे कारणावरून आपसांत बाचाबाचीमुळे भांडण होवुन मारहाण झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या विरुध्द सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालणे व हाणामारी करणे याबाबत भादंवी कलम 160 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तरूणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात आली असुन पोलसांची सर्व परिस्थीतीवर नियंत्रण असुन अजिंठा गावात शांतता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


पोलिसांचे आवाहन... 


या घटनेनंतर औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शल मिडीयाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवु नये अगर फॉरवर्ड करू नयेत. तर, जुने विवादीत बाबीचा काही असामाजिक तत्व हे फायदा घेवुन सोशल मिडीयाचे माध्यमांतुन निराधार व खोटी अफवा पसरवुन जाती- जातीत तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजकंटकाद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येवुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साद घालुन निष्पाप तरूणाईचे डोक्यात इतराबाबत द्वेष निर्माण करण्यात येतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष ठेवावे जेणे करून त्यांच्याकडुन प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावले जातील अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमांतुन दिले जाणार नाही यांची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन कलवानिया यांनी केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


काय सांगता! चोरीच्या सोन्याला पाय फुटले, पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह?; पाहा औरंगाबादमध्ये काय घडलं?