Nashik Chhagan Bhujbal : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी जे आमंत्रण दिले, त्याबद्दल आभारी आहे. त्यांचा निमंत्रणाचा स्वीकार करून मी त्यांना भेटणार आहे. ते मला कोणतं पद देणार यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. कालच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळ अस्वस्थ असल्यास त्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे, असे जाहीर आवाहन केले होते. या आवाहनाला भुजबळांनी प्रतिसाद देत भेट घेणार असल्याचे म्हणाले आहेत. 


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाशिक मध्ये आले होते. त्यावेळी  त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. भुजबळ यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया देताना भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय काल नाशिक (Nashik) शहरात आलेले रामदास आठवले यांनी भुजबळांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. यावरही भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, लवकरच आठवले यांची भेट घेऊन त्यांना मला कोणते पद देणार हे विचारणार आहोत. त्याचबरोबर पुण्यात युवतीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयितांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच न्यायव्यवस्थेने कोणताही दया माया न दाखवता असा संशयितांवर कडक कारवाई करावी, असेही ते म्हणाले. 


नुकतच भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले. यावर छगन भुजबळ म्हणाले की, भिडे गुरुजी यांना अटक व्हायला हवी. त्यांनी जे म्हटलं, हे जर दुसरं कोणी म्हटलं असतं, तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. भिडे गुरुजी संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत असल्याचा आरोपही यावेळी भुजबळ यांनी केला. तर पुणे शहरातील सदाशिव पेठेत युवतीवर हल्ला झाल्याची घटना घडली. यावर भुजबळ म्हणाले की, हे काय चाललंय काय? महात्मा फुले यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केलं. अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे? असा संतप्त सवाल करत पोलीस आयुक्त काय करतात? यावर कडक करण्यात यावी. तसेच मोक्का लावण्यात यावा. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेने जरा सुद्धा दया दाखवता कामा नये, असे आवाहन देखील भुजबळ यांनी केले आहे.


दरम्यान सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अशातच पहिल्याच पावसात मुंबई शहरातील नाले तुंबल्याचे दिसून आले. यावर भुजबळ म्हणाले की, पहिल्या पावसात कुठल्याही शहरात रस्ते तुंबण्याचे प्रकार घडतात. यावर शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रॅफिक पोलिसांना खड्डा कुठे आहे, याची माहिती असते. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना ताबडतोब कल्पना द्यावी. मुंबईतला काही भाग बशीसारखा आहे, त्यामुळे पाणी साचते. गटार जर नीट साफ केली नाही, तर असे प्रश्न उद्भवतात. मुख्यमंत्री फिरत आहेत, ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अंजनेरी ते ब्रम्हगिरी रोपवे न होण्याबाबत पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले की, जर निसर्गाची हानी होत असेल, तर कुठपर्यंत जायचं हे ठरवलं पाहिजे. सगळं बॅलन्स असले पाहिजे, असेही ते म्हणाले. 


एक दिवसाची रोजी रोटी बुडते... 


तर महाराष्ट्र सरकारकडून शासन आपल्या दारी असा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात लोकांना सक्तीने बोलवले जात असल्याची टीका केली जात आहे. यावर भुजबळ म्हणाले की, याबाबत मला काही फारसं माहित नाही. पण अशा प्रकारच्या अटी ठेवणे योग्य नाही. एक दिवस तुमच्यासाठी यायचं म्हणजे, गरीब लोकांची रोजी रोटी बुडते, असे म्हटले आहे. तसेच आज राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडते आहे. यावर भुजबळ म्हणाले की, मला कल्पना नाही, मला त्या कार्यकारीणीचे आमंत्रण नाही. मी काही राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही, त्यामुळे मला काही माहिती नसल्याचे भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर येत्या जुलै महिन्यात महाविकास आघाडीच्या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर भुजबळ म्हणाले कि, मला काही त्यातली कल्पना नाही असे भुजबळ म्हणाले.


Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडून रिपब्लिकन पक्षात यावं, मंत्री रामदास आठवले यांची ऑफर