Agriculture News : नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या हरभरा खरेदीच्या नोंदणीस 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला हरभरा खरेदीच्या नोंदणीस 15 मार्चपर्यंतची मुदत देण्यात होती. मात्र, शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या या मागणीला अखेर यश आलं आहे. 


हरभरा खरेदीच्या नोंदणीस मुदवतवाढ द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी  फार्मर प्रोड्युसर कंपन्याचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हरभरा खरेदीला  मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तसेच नाफेडचे बी. एम. श्री.पुनीतसिंग, सहकार व पणन सचिव प्रधान सचिव अनुपकुमार यांच्यासमवेत फोनवरुन दोन-तीन वेळेस सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचा संवेदनशीलपणे विचार करून 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 


बुलढाणा जिल्ह्यात 75 खरेदी केंद्र चालू व्हावी, शेतकऱ्यांची मागणी


दरम्यान, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या मुदतवाढीमुळे नाफेडमध्ये हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. तसेच यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचीही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 75 हरभरा खरेदी केंद्र होती. परंतू यावर्षी अद्याप फक्त 24 हरभरा खरेदी केंद्र चालू आहेत. तरी मागील वर्षीप्रमाणे 75 खरेदी केंद्र चालू व्हावे, या मागणीसाठी आमचा लढा चालूच राहणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली. 


 राज्यात 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड 


यावर्षी राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले निघत आहे. परंतु उत्पादित हरभरा विकायचा कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कारण नाफेडच्या वतीने हरभरा हमीभावाने खरेदी केला जातो. परंतु या खरेदी अद्याप सुरु झाली नाही. परिणामी शेतकरी हरभरा मार्केटमध्ये विकत आहेत. तिकडे हा हरभरा 4 हजार 300 रुपये दरानं विक्री होत आहे. तर हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 335 रुपये इतका आहे. सध्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1 हजार रुपये आर्थिक नुकसान होत आहे. 


हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव 


हरभऱ्याला शासनाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये इतका आहे. तर खुल्या बाजारात याच हरभऱ्याला व्यापारी कमी भाव देत आहेत. खुल्या बाजारात हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. नाफेडच्या वतीनं ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी खरेदी सुरु झाली नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : हरभऱ्याला शासनाचा 5 हजार 335 रुपयांचा हमीभाव, तर खुल्या बाजारात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक