Ajit Pawar In Nashik : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नंदुरबार जिल्ह्याच्या (Nandurbar) दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्ये धनंजय मुंढे हे देखील असणार आहेत. तर मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर येणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजते आहे. त्यामुळे आज राज्यातील बड्या नेत्यांची मांदियाळी उत्तर महाराष्ट्रात उपस्थित असणार आहे. 


आज काही महिन्यानंतर अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर येत असून ते नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यात भेटी देणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने या ठिकाणी नेमके यकाय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे कालपासून एअर बस प्रकल्पाबाबत राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भूमिका मांडता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याबरोबर धनंजय मुंढे हे देखील नाशिकमध्ये असून सध्या राज्यात राजकीय नेत्यांचे दौरे वाढले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 


दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असून ते निफाड तालुक्यातील रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या40 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत येथील स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेस भेट देणार आहेत. याबाबतचा दौरा हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. 


अजित पवारांची सुरक्षा कमी केली.. 
दरम्यान महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने काढली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णायावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यामध्ये अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंढे यांचीदेखील सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार आणि मुंढे याबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.