Balya Singer Died : अल्पावधीच युट्यूबवर प्रसिद्ध झालेला लोकगायक बाळ्या सिंगर (Balya Singer) उर्फ बाळा रतन दिवे या आदिवासी गायकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मासेमारी (Fishing) करण्यासाठी नदीत गेला असताना बाळा दिवे याचा नदीत बुडून मृत्यू (Death by Drowning in The River) झाला. ही घटना शहापूर तालुक्यातील (Shahapur Taluka) पळसपाडा गावाच्या हद्दीत घडली. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, 'आगं पोरी तू स्वप्नात येना' या गाण्यामुळे अल्पावधीतच बाळ्या सिंगर युट्यूबवर प्रसिद्ध झाला होता. शहापूरमधील तरुणांमध्ये बाळा दिवे याच्या गाण्यांची विशेष क्रेझ होती. 


आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमुळे बाळ्या सिंगर उर्फ  बाळा हा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. आदिवासी समाजातील अनेक लोककला आणि गाणी बाळामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली होती. बाळा आपली पत्नी आणि चार मुलांसह शहापूर तालुक्यातील आसनगावात राहत होता. बाळ्या आसनगावाजवळच असलेल्या वालसेत गावातील आदिवासी पाड्यातील रहिवाशी होता. आपली आणि कुटुबांची उपजीविका चालविण्यासाठी मासेमारी, तर कधी वीटभट्टीवर मोलमजुरी करीत होता. लहानपणापासूनच  बाळाला गाण्याची आवड होती. त्याची आवड पाहून त्याच्या आईनं त्याला तो साधारण 12 वर्षांचा असताना विविध आगरी कोळी आदिवासी गाण्याच्या कॅसेटसह टेपरेकॉर्ड दिला होता. तेव्हापासूनच त्यानं आपली स्वतःची गाणी रचण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच तो तरुणांमध्ये प्रसिद्ध झाला. तरुणांमध्ये तो 'बाळ्या सिंगर' म्हणून प्रसिद्ध होता. 


अल्पावधीतच बाळ्या सिंगरनं आपल्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं होतं. बघता बघता बाळ्याची गाणी केवळ शहापूरमध्येच नाहीतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध झाली. बाळ्याच्या आवाजानं शहापूरसोबतच संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याला वेड लावलं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बाळाच्या खांद्यावर होती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाळा मासेमारी करुन गावागावात जाऊन ते विकत असे. एका आदिवासी कुटुंबांचा मासेमारी करणारा बाळ्या मासे विक्रीसाठी गावागावात जाऊन गाणं म्हणायचा. एवढंच नाहीतर क्रिकेटचे सामने, इतर कार्यक्रमांत गाणी म्हणण्यासाठीही बाळाला आयोजक आवर्जुन बोलवत असत. बाळाच्या जाण्यानं संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.