Marathwada Cabinet Meeting: मराठवाड्यात मंत्री मंडळाची एक दिवसीय बैठक (Cabinet Meeting) बोलवण्याची मागणी करत एका तरुणाने महाराष्ट्र दिनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हा परिषदेच्या टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केले. तसेच जोपर्यंत लेखी हमी दिली जाणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. तर पोलिसांकडून या तरुणाला खाली उतरण्याचे आवाहन करण्यात आले. पण तो आपल्या मागणीवर ठाम होता. अखेर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी घटनास्थळी जावून या तरुणाची समजूत काढली आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली. त्या नंतर तब्बल एका तासानंतर हा तरुण खाली आला. बाबा उगले असे टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो जालना जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या राजकारणात मराठवाड्याच मोठं योगदान आहे. एवढच नाही तर सध्याच्या मंत्रीमंडळात देखील मराठवाड्यातील अनेक आमदारांना मंत्री पदाची संधी देखील मिळाली आहे. मात्र असे असताना गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत असलेल्या मराठवाड्यात मंत्री मंडळाच्या बैठकीच्या मागणीला सरकार दुलर्क्ष करत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मराठवाड्यात शेवटची मंत्रीमंडळाची बैठक 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकही मंत्रीमंडळाची बैठक मराठवाड्यात होऊ शकली नाही. त्यामुळे मराठवाड्यात मंत्री मंडळाची एक दिवसीय बैठक बोलवण्याची मागणी करत जालना जिल्ह्यातील बाबा उगले नावाच्या तरुणाने आज (1 मे) छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन केले. तर शिरसाट यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा तरुण तब्बल एक तासाने खाली आला.
17 सप्टेंबरला मराठवाड्यात कॅबिनेट बैठक होणार : शिरसाट
मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्याची मागणी सातत्याने होत आहे. तर लवकरच मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात घेतली गेली पाहिजे या मताचा मी आहे. विभागात बैठक घेतल्याने मराठवाड्यावरील अन्याय दूर होईल. त्यामुळे मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक व्हायला हवी यासाठी मी प्रयत्न करेल. तसेच 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक होईलच, असेही शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sanjay Shirsat: अजित पवारांच्या मनात काय? येत्या चार दिवसांत कळेल; संजय शिरसाट यांचा मोठा दावा