Nashik Crime : रेल्वेमध्ये नोकरीला लावून देण्याची आम्हीच दाखवून पास तरुणांना बोगस नियुक्तीपत्र (Fraud Appointment Letter) देत तब्बल 55 लाखांची फसवणूक (Crime) केल्याचा प्रकार अंबडमध्ये (Ambad) उघडकीस आला आहे. अंबड पोलिसांनी या प्रकरणी संशयितांसह त्याची पत्नी आणि मुली विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे तिघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसांत नाशिक (Nashik) शहर परिसर व जिल्ह्यात फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांना वेळोवेळी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. मात्र तरी देखील फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहे. अशातच नाशिक शहरातील स्वप्निल विसपुते यांना देखील फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. विसपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित भाऊ सिंग साळुंखे, मनीषा साळुंखे, श्रुतिका साळुंखे यांनी संगनमत करत रेल्वेमध्ये टीसी पदावर भरती होणार असल्याचे सांगत तुम्हाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले. तसेच रेल्वेमध्ये मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे असून ऑनलाईन परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तात्काळ नोकरी लावून देण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान विसपुते आणि त्यांचे नातेवाईक पंकज पवार, सोनाली पाटील, मनीषा सुरवाडे, शिवाजी मरळकर यांना याबाबत माहिती दिली. नोकरी मिळणार असल्याने त्यांनी संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. संशयिताने विसपुते आणि सोनाली पाटील यांच्याकडून 13 लाख 70 हजार, पंकज पवार यांच्याकडून 15 लाख, मनीषा सुरवाडे यांच्याकडून दहा लाख, शिवाजी मरळकर यांच्याकडून 11 लाख रुपये घेतले. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा देण्यास सांगितले. त्यात पास झाल्याचा बोगस रिझल्ट तयार केला. यात उमेदवार पास झाल्याचे दाखवत त्याचे बोगस नियुक्तीपत्र तयार करून त्यांना नाशिकरोड, मुंबई, जबलपूर येथे हजर होण्यास सांगितले. हे सर्व तरुण हजर होण्यास गेले असता अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती नसल्याचे करण्यात आलेली नसल्याचे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
अशी झाली फसवणूक
संशयित साळुंखे यांनी मुलगी श्रुतिका रेल्वेमध्ये नोकरीला लागल्याचे सांगत इमारतीमध्ये पेढे वाटले. विसपुते यांनी अभिनंदन केले. यानंतर विसपुते मुलीची निवड कशी झाली? काय प्रक्रिया आहे? याबाबत विचारले असता संशयिताने माझी रेल्वेमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे, असे सांगून 11 जागा आहेत, त्यावर उमेदवार पाहिजे, असे सांगितले. विसपुते यांना विश्वास पटल्याने त्यांनी जवळच्या नातेवाईकांना सांगितले. दरम्यान नातेवाईकांना देखील विश्वास झाल्याने त्यांनी देखील होकार दिला. संशयिताने याचा फायदा घेत पैसे घेऊन पोबारा केला. संशयिताने या सर्व उमेदवारांची जबलपूर येथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना नियुक्तीपत्र देत हजर होण्यास सांगितले. उमेदवार निर्देशित ठिकाणी गेल्यावर त्यांना अशा प्रकारची कुठली भरती नसल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
येवल्यात डॉक्टरची फसवणूक
येवला शहरातील थिएटर रोड परिसरात होमिओपथी डॉ. मंजुषा भालेराव यांना अज्ञात चोरट्याने ऑनलाईन एक लाख 43 हजार रुपयांचा गंडा घातला. चोरट्याने भालेराव यांना कॉल करून क्रेडिट कार्डचा वापर केला नाही, तर दंड लागला असा बनाव केला. तो रद्द करण्यासाठी भालेराव यांना कॉलवर बोलण्यात गुंग ठेवत त्यांनी नकळत त्यांच्या कार्डचा तपशील मागितला. यानंतर चोरट्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून भालेराव यांच्या क्रेडिट कार्डद्वारे एक लाख 43 हजार 267 रुपयांची खरेदी केली. भालेराव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.