Nashik youth Suicide : नाशिकमध्ये अवघ्या 21 वर्षाच्या तरुणानं नैराश्यातून आत्महत्या (Youth Suicide) केल्याची घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. एकीकडे राज्यात 75 हजार नोकऱ्या देण्याची (Jobs) घोषणा सरकार करत आहे. तर दुसरीकडे हातात पक्की नोकरी मिळत नाही, खासगी कंपनीत ब्रेक दिला जातो तर आई वडीलांचेही कष्ट बघवले जात नसल्याने म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली.
नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरात राहणाऱ्या रोहीत वाघ (Rohit Wagh) या एका 22 वर्षीय तरुणाने अशी चिठ्ठी लिहीत आपलं जीवन संपवलय. रोहितचे आई वडील किराणा दुकान चालवतात, तर लहान भाऊ 11 वीचं शिक्षण घेतो. आई वडीलांनी मोठ्या कष्टाने रोहितला मोठे केले होते, दहावीनंतर मेकॅनिकल डिप्लोमाचे शिक्षण घेत अंबड परिसरातील (Ambad) एका खाजगी कंपनीत तो नोकरीला लागला होता. 22 हजार रुपये पगारावर दोन वर्ष कामं केल्यानंतर त्याला कंपनीत ब्रेक देण्यात आला. त्यानतंर 40 हजार रुपये खर्चून डिझाईन इंजिनिअरींगचा रोहितने कोर्स केला, मात्र तो कोर्स करताच, त्याला नविन जॉबची ऑफर तर आली मात्र ति 15 हजार रुपये पगाराची. त्यामुळे खाजगी कंपनीत मिळालेला ब्रेक, दुसऱ्या कंपनीत पहिल्या कंपनीपेक्षा कमी सांगण्यात आलेला पगार, आई वडीलांचे न बघवणारे कष्ट या सर्व परिस्थितीला वैतागून नैराश्यात त्याने शनिवारी सायंकाळी आई वडील दुकानासाठी माल घ्यायला बाहेर जाताच बेडरूममधील हुकाला दोरी बांधत गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. तसेच हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने टेबलावर एक चिट्ठीही लिहून ठेवली होती.
''मम्मी, पप्पा आणि सार्थक.. मी एक खूप मोठा Loser आहे.' 'मी कुठल्या तोंडाने तुम्हाला समजवू हे समजत नव्हते. मी डिप्लोमा केला त्यानंतर डिग्री नाही केली कारण गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करायचे होते, ते प्रिपरेशन पूर्ण नाही केली व जॉबला लागलो. तीन वर्षे चांगल्या पद्धतीने जॉब केला नंतर 40 हजार खर्च करून डिझाईन इंजिनियरचा कोर्स केला त्यावर मला जॉब भेटला 15 हजाराचा, म्हणजे परत सर्व पहिल्यापासून सुरु. माझे वय 22 झाले आहे. यावेळी मी तुमची व घराची जबाबदारी घ्यायला हवी, पण माझे काही वेगळेच चालू आहे. माझे खूप निर्णय चुकले त्याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागत आहेत. मी बावीसचा झालो तरी तुम्हाला काम करायची वेळ येते हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे आहे.''
चिट्ठीत शेवटी फोनचा पासवर्ड, युपीआय पासवर्ड आणि बँक डिटेल्स देऊन 'आता बस मी थांबतो.. तुमचा रोहित' असं म्हंटलय.. रोहितच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितचे वडील संजय वाघ म्हणाले कि, त्याने तीन कंपनीत जॉब केला. पहिले आठ साडेआठ हजार, दुसऱ्या कंपनीत 15 आणि त्यानंतर तिसऱ्या कंपनीत अनुभवाच्या जोरावर 22 हजार रुपये त्याला पगार मिळाला होता. ब्रेक मिळणार कळताच त्याने डिझायनिंग कोर्स केला, मात्र त्यांनतर त्याला 15 हजारांची जॉबची ऑफर आल्याने तो नैराश्यात आला होता. वडील म्ह्णून कदाचित मी देखील त्याच्याशी संवाद साधायला कमी पडलो, ईतर कोणी असं पाऊल उचलू नका, असे आवाहन देखील त्याच्या वडिलांनी केलं आहे.
सरकारच्या फक्त घोषणाच का?
एकीकडे राज्यात 75 हजार नोकऱ्या देण्याची घोषणा सरकार करत असतांनाच दुसरीकडे हातात पक्की नोकरी मिळत नाही म्हणून तरुण मुलं अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलत असतील तर सरकारने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली असून कंपनी कायद्यांची अंलबजावणी निट होत नाही का ? असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. दरम्यान याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जॉबच्या नैराश्यातच रोहितने हे पाऊल उचलल्याचे पोलीस सांगत आहेत.
आपल्या कुटुंबाचा जरा विचार करा
या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले कि, बाविसाच्या वर्षीच रोहित हे जग सोडून गेला आणि सोबत आपले स्वप्नही घेऊन गेला. मात्र एवढं टोकाचं पाऊल उचलण्याआधी वडील, नातेवाईक म्हणा किंवा मित्रांजवळ त्याने मनमोकळं केलं असतं तर नक्कीच काहीतरी तोडगा निघू शकला असता, भविष्यात त्याला चांगली नोकरीही मिळू शकली असती. त्यामुळे तरुणांनो खचू नका, हार मानू नका आत्महत्या हा काही शेवटचा पर्याय नसून असे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा जरा विचार करा, असे कळकळीचे आवाहन उपायुक्त चव्हाण यांनी केले आहे.