Kolhapur Crime: हक्काचं, मायेचं अन् नात कोणतंही असू दे त्यात जीवाला जीव लावणाऱ्या कोल्हापुरात (Kolhapur News) गेल्या सहा महिन्यांपासून आत्महत्यांच्या भयावह मालिका सुरु आहेत. अंगाचा थरकाप उडावा, अशा पद्धतीने आत्महत्येच्या सलग घटनांनी कोल्हापूर हादरून गेले आहे. गरीबी, नोकरी व्यवसायातील नैराश्य, व्यक्तीगत आयुष्यातील अपयश, प्रेमसंबंध, वय होऊनही लग्न न जुळणे, पती पत्नीमधील वाद, कौटुंबीक कलह, सासरमधील होणारे छळ आणि आभासी दुनियेतील स्वप्ने आदी कारणांमुळे कोल्हापुरात आत्महत्यांची मालिकाच सुरु आहे. आत्महत्येसारखा निर्णय घेताना आपल्या पोटच्या लेकरांचे काय? कुटुंबाची होणारी वाताहत याचाही सारासार विचार केला जात नसल्याचे चित्र आहे. 


गडहिंग्लजमधील प्रख्यात उद्योगपती संतोष शिंदे यांनी कुटुंबासह केलेला अत्यंत भयावह शेवट आणि पन्हाळा तालुक्यातील वृद्ध जोडप्याने गरीबी आणि आजारपणाला कंटाळून स्वत:च सरणाची तयारी करून केलेल्या सामूहिक आत्महत्येनं कोल्हापुरातील धरण, नद्यांमधील पाण्यासह रक्ताच्या नात्यातील मायेचा ओलाही कोरडा पडून गेला की काय? इतपत शंका यावी या पद्धतीने भयावह पद्धतीने आत्महत्यांच्या सलग मालिका सुरु आहे.  


महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या सर्वाधिक आत्महत्या 


जानेवारी 2023 ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तब्बल 252 स्त्री आणि पुरुषांनी मिळून आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये तब्बल 202 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 52 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्येही 18 ते 30 या कमावत्या गटातील तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्या या चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. अल्पवयीन मुलांकडून गळ्याला दोरी लावण्याचे प्रकार घडत आहेत. 257 मधील आत्महत्यांपैकी यामधील तब्बल 75 आत्महत्या फक्त जानेवारी महिन्यात झाल्या होत्या. गगनाला भिडलेली महागाई, जगण्याशी रोज होत असलेली जीवघेणी स्पर्धा, लेकरांचे शिक्षण, अपेक्षांचे ओझे, कुटुंब सुखात रहावे म्हणून केली जाणारी धडपड आदी कारणामुळे पुरुषांकडून दबून जाऊन, तर टोकाचा निर्णय होत नसेल ना? याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. रक्ताच्या नात्यातील सोशल मीडियातील आभासी दुनियेमुळे कमी होत चाललेला संवादही चिंताजनक आहे. आत्महत्यांची मालिका असतानाच किरकोळ कारणातून होणारे निर्घृण खूनही चिंताजनक होत चालले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील गुन्हेगारी वाढत चालली आहे का? असाही प्रश्न उपस्थित  झाला आहे. 


वाकरेमध्ये दीड महिन्यात चार तरुणांची आत्महत्या 


अल्पवयीन प्रेम प्रकरणातून आलेलं अपय़श किंवा निराशा, व्यक्तीगत आयुष्यातील ताण, जीवघेण्या स्पर्धेचा घेतलेला अतिरिक्त ताण, वास्तवाचे भान सोडून आभासी दुनिये मुसाफिरी आणि कुटुंबाशी दुरावत चाललेला संवाद आदी कारणांमुळे हा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. करवीर तालुक्यातील वाकरेमध्ये दीड महिन्यांतील वयाची पंचवीशी सुद्धा न पाहिलेल्या चौघा तरुणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. शिंगणापूरमधील तरुणाने स्थिरस्थावर असूनही लग्न ठरत नसल्याने केलेली आत्महत्या चिंतन करायला लावणारी आहे.


लग्नानंतर 15 दिवसांमध्येच विवाहितेची आत्महत्या 


जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील निवडेमधील लग्नाच्या अवघ्या 15 दिवसांनी नवविवाहिताने घरी कोणीही नसताना आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, कोल्हापूर शहरात वयाची पंचवीशीसुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक असलेल्या तरुणाने व्हाॅट्सअॅपला स्वत:चा फोटो ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे कमी म्हणून की काय उच्चशिक्षित आणि प्रेमविवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केलेल्या किरकोळ वादातून जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार एप्रिल महिन्यात गोकुळ शिरगावमध्ये घडला होता. मात्र, सुदैवाने दोघांनीही एकमेकांना वाचवल्याने संकट टळले होते.


तोंडात बोळा घालून स्वत:च्या हाताने गळा चिरुन आत्महत्या


इचलकरंजीत स्वतःच्या हाताने चाकूने गळा चिरुन बेकरी व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. राकेश उर्फ सूरज सुभाष कुडचे (रा. कुडचे मळा, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. राकेशने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन किसान चौक परिसरात बेकरी साहित्य विक्रीचे दुकान सुरु केले होते. दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर मात्र राकेशने अत्यंत भयानक पद्धतीने स्वत:ला संपवल्याचे समोर आले. धारदार चाकू तसेच कात्रीने मानेवर आणि गळ्यावर त्याने वार करुन घेतले. बाहेर आवाज येऊ नये, यासाठी राकेशने तोंडात बोळा घेत आत्महत्या केली.  


सुट्टीवर आलेल्या दोन जवानांकडूनही टोकाचा निर्णय 


चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झालेल्या अविवाहित जवानाने सुट्टीवर घरी आल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली होती. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय 23) असे त्यांचे नाव आहे. त्यापूर्वी पन्हाळा तालुक्यातील काखे गावामध्ये सत्यजीत खुडे या जवानाने सुट्टीवर आल्यानंतर घरीच आत्महत्या केली होती.


मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या 


मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


दोन जिवलग मित्रांची एकाचवेळी गळफास घेत आत्महत्या


हातकणंगले तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना एप्रिल महिन्यात घडली होती. विनायक पाटील व त्याचा मित्र बाबासाहेब मोरे यांनी एकाच झाडाला आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली होती. त्यापूर्वी, माजी सरपंच पत्नीने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.  आजाराला कंटाळून रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी घेऊन जयसिंग नामदेव कणसे (वय 48 वर्षे, सध्या रा. शिरोली पुलाची, मूळ रा. सातारा) यांनी आत्महत्या केली. गडहिंग्लज तालुक्यात शिक्षकानेही आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली. 


प्रेयसीचा नकार अन् केली आत्महत्या 


प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने विवेक विष्णुदास शर्मा (वय 30, रा.जानकीनगर, तीन बत्ती चौक, इचलकरंजी) या युवकाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली होती. याच इचकरंजीत एकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.  तरुणाला कंटाळून आत्महत्या मार्च महिन्यात कोल्हापुरात कोल्हापुरात विवाहितेची लहान मुलासह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येची घटना ताजी असतानाच तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. 


तरुण डाॅक्टरची आपल्याच दवाखान्यात आत्महत्या


कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये डॉक्टर महेश रामचंद्र तेलवेकर (वय 40 वर्षे) यांनी आपल्याच दवाखान्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनांनी समाजमन सुन्न होत असतानाच अल्पवयीन तरुण तरुणींकडूनही आत्महत्या होत असल्याने समाजमन सुन्न होत चालले आहे. त्यामुळे आयुष्यही न पाहिलेल्या 20 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींच्या आत्महत्या चिंतातूर करणाऱ्या होत चालल्या आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या