Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Molestation) झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. म्हसरूळ येथील निवासी वस्तीगृहात (Hostel) राहणाऱ्या आदिवासी शाळकरी मुली सोबत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वस्तीगृहाच्या संचालकानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते. 


नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील अंजनेरी (Anjneri) आधार आश्रमातील चार वर्षीय मुलाच्या खुनाची (Murder) घटना ताजी असतानाच आता हिरावाडी परिसरात मानेनगर येथील आधार आश्रमात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील 30 हुन अधिक मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर संचालकाने अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरातील गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयताच्या मुसक्या आवळण्यात आले आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुली सोबत असा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा हादरले आहे. 


अनाथ किंवा गरजू आदिवासी मुलांमुलींना राज्यभरात काही विशेष आश्रमांची व्यवस्था केली जाते. अशाच प्रकारचा हा एक आश्रम आहे. ज्यांच्याकडे घर नाही आहे, ज्या बेघर आहेत अशा मुलींसाठी ही व्यवस्था आहे. तिथे तीस मुली सध्या राहतात, मात्र यापैकी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर हे हॉस्टेल चालवणाऱ्या संचालकानच अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या (Mhasrul Police station) अंतर्गत माने नगर आहे. त्या ठिकाणी एका रो हाऊसमध्ये हॉस्टेल उभारण्यात आले आहे. तिथे मुलं मुली राहत होते, मात्र मुलांची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी होती. येथील मुलींना तिथे अनेक दिवसापासून त्रास दिला जात असल्याची चर्चा आहे आणि त्यात एका अल्पवयीन मुलीवर तिथल्या संचालकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहेत. 


दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यास ताब्यात घेतले आहे. त्याला आता कोर्टात हजर देखील करण्यात आलेला आहे.  मात्र पोलिसांकडून अद्याप या प्रकरणाचा कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयता विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे अंजनेरी येथील घटनेला एक दिवस पूर्ण होत नाहीत तोच आधार आश्रमातील ही दुसरी धक्कादायक घटना समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.