PCMC Accident : पिंपरी चिंचवडमध्ये (Pcmc) सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा (accident) अपघातात मृत्यू झाला आहे. अथर्व आळणे असं या अकरा वर्षीय मुलाचं नाव होतं. आईच्या डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अथर्व आणि त्याची आई मोशी प्राधिकरण येथून चिंचवडला निघाले होते. चिंचवडच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कुलमध्ये सोडायला नेहमीच येतात. याच रस्तावर त्यांचा अपघात झाला. यात अथर्वचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे आळणे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. 


गाडीला वॅगनआर कारची धडक लागली आणि त्यानंतर खाली पडलेल्या मुलाच्या शरीरावरुन ट्रकचे टायर गेले. ही दुर्दैवी घटना आज (24 नोव्हेंबर) सकाळी घडली. जुन्या आरटीओजवळ त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली. या धडकेत आई आणि अथर्व दोघेही जमिनीवर कोसळले. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकचे चाक अथर्वच्या शरीरावरुन गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याची आई विरुद्ध दिशेला पडल्या. त्या चारचाकी आणि ट्रकच्यामध्ये आल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्दैवी घटना खड्ड्यामुळे घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. आता याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलेलं आहे. तसेच कार चालकावरही गुन्हा दाखल केला जात आहे.


अपघातात रोज एकाचा मृत्यू


पिंपरी -चिंचवड शहरात अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. शहरात रोज एका व्यक्तीचा मृत्यू रस्ते अपघातात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात 2022च्या पहिल्या दहा महिन्यांत 730 अपघातांची नोंद आहे. त्यात 290 जणांचा मृत्यू झाला असून 448 जण जखमी झाले आहेत. अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी खास उपाययोजन करण्याची गरज आहे. मात्र या उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने रोज एकाचा मृत्यू होत आहे. सर्वाधिक अपघात हे खड्ड्यांमुळे होत असल्याचा दावा देखील स्थानिकांकडून केला जात आहे.