Girish Mahajan : अखेर तेरा दिवसांनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) फेरबदल झाले असून नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहेत. त्यानुसार  भाजपच्या (BJP) मंत्र्यांकडे असणारी सहा आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली तीन खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडील तीन खात्यांपैकी दोन खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आल्याने आता महाजनांकडे एकच खाते उरले आहे. त्यामुळे महाजन यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात येतीय का हे पाहावे लागणार आहे. 


मागील काही दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाला आहे. मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल रमेश बैस यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार अर्थ खात्याचा तिढा सुटून अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्याकडे कृषी खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. भाजपची  सहा खाती तर शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडे तीन खाती अशी नऊ खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. यात सर्वाधिक फटका मंत्री गिरीश महाजन यांना बसलेला आहे. त्यांच्याकडे ग्रामविकासह वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण अशी तीन महत्वाची खाती होती. नव्या मंत्रिमंडळ फेरबदलात यातील दोन खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. 


मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण हे खाते आता हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच महाजन यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण हे खाते देखील होते, ते देखील राष्ट्रवादीचे नवे मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज हे एकमवे खाते राहिले आहे. मात्र दोन खाती गमावल्यानंतर महाजन यांच्याकडे नवी जबाबदारी देण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे. कारण मंत्रिमंडळाच्या फेरबदलात मंत्री दादा भुसे यांची बढती होऊन सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा बहुदा पुन्हा महाजन यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र अद्याप यावर काही निर्णय नसला तरी या मंत्री मंडळ फेरबदलानंतर दादा भुसे, छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यापैकी कुणावर पाल्कमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


अजित पवार अर्थमंत्रीपदी 


शिवसेनेतून बंड करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार हे निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव देत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वारंवार बैठका सुरू होत्या. अखेर आज खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची धुरा सोपवण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या : 


Girish Mahajan : राज्य सरकारचं खाते वाटप जाहीर, मंत्री गिरीष महाजनांची प्रतिक्रिया ...