Aurangabad News: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावतीने शहरातील आमखास मैदानावर खासदार चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, रविवारी रात्री या स्पर्धेचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते द्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी अब्दुल सत्तार आणि जलील यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. मात्र सत्तार यांनी केलेल्या बॉलिंगवर इम्तियाज जलील क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांमधील रंगलेल्या क्रिकेट सामन्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
इम्तियाज जलील संस्थापक असलेल्या दुआ बँकेच्यावतीने आमखास मैदानावर स्पोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात क्रिकेट, शरीरसौष्ठव, फुटबॉल, कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी अब्दुल सत्तार आणि जलील यांच्या क्रिकेट सामना देखील पाहायला मिळाला. ज्यात सत्तार यांनी बॉलिंग केली तर जलील यांनी बॅटिंग केली. मात्र सत्तार यांच्या पहिल्या बॉलवर शॉट मारणारे जलील दुसऱ्या बॉलवर क्लीन बोल्ड झाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांच्या नात्याची कायम चर्चा होते.
मी स्वतः आऊट झालो...
तर यावर बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले की, सत्तार यांच्या बॉलवर मी आऊट झालो नसून, स्वतः आऊट झालो होतो.अब्दुल सत्तार हे मला कधीच आऊट करणार नाही, ते मला नेहमीच जिंकवणार असल्याचा टोला जलील यांनी यावेळी लगावला. सोबतच पुढील 20 दिवस आमखास मैदानावर स्पोर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर याच मैदानात फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जलील यांनी यावेळी दिली.
भाजपच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली...
जलील यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासह राज्यमंत्री, आमदार, सनदी अधिकारी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र भाजपच्या मंत्र्यांसह इतर आमदार आणि मंत्र्यांनी देखील याठिकाणी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. तर शिंदे गटाचे एकमेव मंत्री अब्दुल सत्तार याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अनकेदा एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याची टीका झाली आहे.