Solar powered village: रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे गाव महाराष्ट्रातील पहीले सौर ऊर्जेवर चालणारे गाव (First Solar powered village) म्हणून ओळखले जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 'मरळनाथपूर' असं या गावाचं नाव आहे. मरळनाथपूर या आपल्या गावाला 100 टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट अशी मंजूरी मिळाल्याची माहिती खुद्द सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
गावातील सर्व घरे, शाळा सौरऊर्जेवर चालणार
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे आणि राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मरळनाथपूर या गावाला 100 टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून 'महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट' अशी मंजूरी मिळाली आहे. सदरच्या प्रकल्पामुळे गावातील सर्व घरे, ग्रामपंचायत ऑफिस, पाणीपुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्था यांची ऊर्जेची 100 टक्के गरज भागणार असून हे गाव सौरऊर्जा स्वयंपूर्ण होणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मरळनाथपूर गावामध्ये भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सदर प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गावाच्या वतीने आभार मानले.