Maharashtra Gram Panchayat Election 2022:: राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
संबंधित तालुक्यातील तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 21 ते 27 सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील. मात्र, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. तर, 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायती निवडणुकीचे मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.
राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणुका होणार असल्याने सगळेच राजकीय पक्ष जोर लावणार आहे. त्यामुळे या निवडणुका मोठ्या रंगतदार होणार असल्याचा अंदाज आहे.
>> कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतीच्या निवडणूका?
> ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, आणि शहापूर- 79.
> पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 आणि वाडा- 70.
> रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 आणि श्रीवर्धन- 1.
> रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 आणि राजापूर- 10.
> सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 आणि देवडगड- 2.
> नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 आणि पेठ- 71.
> नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 आणि नवापूर- 81.
> पुणे: मुळशी- 1 आणि मावळ- 1.
> सातारा: जावळी- 5, पाटण- 5 आणि महाबळेश्वर- 6.
> कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 आणि चंदगड- 1.
> अमरावती: चिखलदरा- 1.
> वाशीम: वाशीम- 1.
> नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 आणि कुही- 8.
> वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
> चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 आणि ब्रह्मपुरी- 1.
> भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 आणि साकोली- 1.
> गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 आणि अर्जुनी मोर- 2.
> गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 आणि गडचिरोली- 1.