Maharashtra News : राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे. तर तिकडे जळगाव, नाशिकमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्याचं समोर आलं आहे.. तर मलकापूरमध्ये नंदी दूध पीत असल्याचं माहित होताच मंदिरात भजन किर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान नंदी दूध पित असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलं आहे.
वर्ध्यातील आष्टी तालुक्यातील शिवशंकर मंदिरात शेकडो नागरिकांची अचानक गर्दी झाली. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नंदी दूध पित असल्याच्या अफवेने मंदिरात लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केली. कोपरगाव, राहाता आणि संगमनेर शहरात अशीच अफवा सुरू झाल्यावर गर्दी वाढली.
औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील अनेक गावात ही नंदी दूध पितो म्हणून अनेक लोक दूध घेऊन मंदिरात पोहोचले. वाळूज परिसरात नंदी दूध पित असल्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली, आपापल्या परिसरात असलेल्या महादेव मंदिरात दूध, पाणी पाजण्याचा प्रयोग नागरिकांनी केला.
तिकडे उत्तर महाराष्ट्रात मालेगाव, नाशिक , जळगाव, सुरगाणा, नंदुरबारमध्ये ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरारात महिला आणि भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सोशल मीडियावर नंदी दूध पित असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानं मंदिरात गर्दी झाली.
नंदी पाणी पितो ही अफवाच - महाराष्ट्र अंनिस
याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं म्हटलं आहे की, नंदी पाणी पितो, अशा प्रकारचा चमत्कार घडत असल्याची अफवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत असल्याचे सांगण्यात येत आहे व तसे व्हिडिओ प्रसारित होत आहे. खरंतर चमत्कार कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हात चलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत,ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे.म्हणून भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डाॅ टी.आर.गोराणे व कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे