Maharashtra LIVE Updates :सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jan 2024 11:50 PM
यवतमाळमध्ये दोन जणांना अटक

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर आयबीच्या टीमने दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. 


नागपूर आयबीने यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला दिली माहिती त्यानुसार पाटनबोरी जवळ जम्मू काश्मीर पासिंग ट्रकने प्रवास करणारे दोन जण ताब्यात घेतले. 
 


दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्राची माहिती 


 

नागपूरमध्ये भीषण आग, दोन जणांचा मृत्यू

नागपूरच्या सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला लागलेल्या आगीत  दोन लहान मुले होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला .. रात्री 9 वाजताच्या सुमारासची हि घटना असून  आग लागली तेव्हा 7 वर्षाच्या बहिणी सोबत दोन लहान भाऊ घरी होते ...आग लागल्या नंतर बहीण घराच्या बाहेर धावत आली दोन्ही लहान मुले आतच अडकली .. घटनेत देवांश उईके वय सह वर्ष व प्रभास उईके वय दोन वर्ष या दोन भावांचा मृत्यू झाला. थंडी पासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली असता त्याने आग लागल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळेस आई वडील कामानिमित्य बाहेर गेले होते.

कॅनलमध्ये पडला रानगवा

चंद्रपूर : गोसेखुर्द कॅनलमध्ये पडला रानगवा... नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील घटना, तीन तासांच्या रेस्क्यु ऑपरेशन नंतर रानगव्याला कॅनल बाहेर काढण्यात यश, कॅनल मध्ये पडलेला रानगवा अंदाजे 10 ते 12 वर्षांचा असून हजार किलोच्या रानगव्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या शिंगांमध्ये अडकविण्यात आला दोरीचा फास

विधानसभा व विधानपरिषद आमदारांसाठी 'मैं अटल हूँ'चा विशेष प्रयोग

विधानसभा व विधानपरिषद आमदारांसाठी 'मैं अटल हूँ'चा विशेष प्रयोग ठेवण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. विधीमंडळात उद्या सायंकाळी ६ वाजता विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व आमदार विधीमंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रयोग ठेवण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. 

केंद्र सरकारच्या कोचिंग क्लासेस साठी नव्या मार्गदर्शक सूचना

केंद्र सरकारच्या कोचिंग क्लासेस साठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक आहे. 


नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपये दंड पुन्हा उल्लंघन केल्यास एक लाख रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते.नियमावलीतील व्याख्यानुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.

महालक्ष्मी रेसकोर्सवरील 'थीम पार्क' विरोधात याचिका

महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकरच्या भूखंडावर 'थीम पार्क' उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. सुनावणीनंतर तूर्तास 'थीम पार्क'बाबत कोणताही निर्णय घेऊ नये, या अंतरिम मागणीवर आम्ही निर्देश देऊ असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.


काय आहे याचिका -


सत्येन कापडिया यांनी हायकोर्टात ही याचिका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल व रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांच्या संयुक्त बैठकीत 6 डिसेंबर 2023 रोजी थीम पार्कबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबईत सध्या फारच थोडे मोकळे भूखंड खूप शिल्लक राहिले आहेत. त्यांपैकी महालक्ष्मी रेसकोर्स हा एक आहे. तिथल्या जॉगिंग ट्रॅकवर नियमितपणे नागरिक चालण्याचा व्यायाम करतात. तसेच तिथं मनोरंजनाचे कार्यक्रमही घेतले जातात. अशा परिस्थितीत नागरिकांचं म्हणणं न ऐकता थीम पार्कचा निर्णय घेणं योग्य नाही, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

2 of 120,152 कोकणातून कोणीतरी येतो म्हणत तानाजी सावंत यांनी भरतशेठ गोगावले यांचे नाव न घेता डागली तोफ

कोणीतरी कोकणातील शिवसेनेचा एखादा यायचा आणि पदाधिकारी निवडीत  पश्चिम महाराष्ट्रात नाक घालायचे , उद्या विधानसभेला यातील एकही निवडून येणार नाही असा सणसणीत टोला आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आपल्याच पक्षाचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे नाव न घेता मारला. सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीत सावंत विरोधी कार्यकर्त्यांना गोगावले यांच्याकडून साथ मिळत असल्याने आज सावंतांनी याचा राग आपल्या भाषणात काढला . जे पदाधिकारी तालुका पंचायत किंवा ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाहीत, असे भुरटे पदाधिकारी नेमले जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच मी सोलापूर जिल्ह्यात लक्ष घालत नाही , सगळं महाराष्ट्र काम करायला माझ्यासाठी आहे असे सांगत त्यांनी आपल्याच पक्षात सुरु असलेल्या गटबाजीवर संताप व्यक्त केला. 

हिंगोलीच्या धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने बारामतीत शरद पवारांची भेट






 Maharashtra LIVE Updates :  हिंगोली येथील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाला तीन जागा मिळाव्यात या मागणीसाठी  भेट घेतलीय. इंडिया आघाडीशी याबाबत बोलून नक्कीच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती सचिन नाईक यांनी दिलीय.







रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भारतीय रेल्वेची जोरदार तयारी

रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भारतीय रेल्वेची जोरदार तयारी सुरु आहे. भारतातील रेल्वे स्थानकांवर डिजिटल स्क्रीनवर प्राणप्रतिष्ठा सोहळा दाखवण्याची तयारी सुरु आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरात जवळपास 9 हजार डिजिटल स्क्रीन लावण्याची शक्यता रेल्वेकडून पडताळून पाहिली जात आहे. 22 जानेवारी चा कार्यक्रम देशभरातील जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर थेट दाखवला जाणार आहे. 

प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर....

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत मोठं विधान. इंडिया आघाडी 28 पक्षाची आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलं पाहिजे किंवा त्यांना एक पत्र लिहिलं पाहिजे.पण प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहे हे मला माहीत नाही, मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटायला प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे. प्रकाश आंबेडकर हे देशातील दलितांचे एक मोठे नेते आहे.. त्यांच्याकडे आंबेडकरी नाव आहे.. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालं पाहिजे त्यांनी संसदेत आलं पाहिजे.अवास्तव मागणी केली तर फायदा मोदींना होतो.. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार पराभूत झाले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

कोपरगाव महंत रमेशगीरीजी महाराज अयोध्यकडे रवाना

शिर्डी : श्रीराम जन्मभुमी न्यासाकडून कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराजांना  मुर्तीप्राण प्रतिष्ठेचे अधिकृत निमंत्रण असल्याने महंत रमेशगिरी महाराज यांनी जनार्दन स्वामी मंदिरात दर्शन घेऊन शिर्डी एअरपोर्ट कडे रवाना झाले.. .यावेळी अयोध्यकडे रवाना होताना रामभक्तांकडून जय श्रीरामाचा जयघोष.करण्यात आला.. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी बाईक रॅलीचे आयोजन केलं होतं... हातात भगवे ध्वज घेत युवकांनी कोकमठाण ते शिर्डी बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला..  या रॅलीत युवा नेते विवेक कोल्हे देखील स्वतः बुलेट चालवत सहभागी झाले.

Maharashtra LIVE Updates : आमदार प्रकाश आबिटकर यांचा इशारा

देवस्थानच्या जमिनींच्या ठरलेल्या वेळेत वारसांच्या नोंदी घाला अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलीय. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात अधिकारी आणि शेतकऱ्यांसमवेत बैठक पार पडली.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांचे अखत्यरित कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 30 हजार एकरहून अधिक जमीनी आहेत.यामधील ज्या शेतकऱ्यांनी खंड भरणा केलेली नाही त्या जमिनींची लिलाव प्रक्रिया करण्याचे आदेश सचिव देवस्थान समिती यांनी दिलेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे.याबाबत जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतीची लिलाव प्रक्रिया सुरू आहे.


मात्र देवस्थानच्या जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा सुरू आहे... त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनींची लिलाव प्रक्रिया सुरू आहे अशा शेतकऱ्यांनी जमीनी कसत असल्याबाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना द्यावेत...कुणाच्याही जमिनीचा लिलाव करू दिला जाणार नाही असा इशारा आमदार अबिटकर यांनी दिला.

Maharashtra LIVE Updates : सुरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणला पाच दिवसांची ईडी कस्टडी सुनावण्यात आली आहे. 22 जानेवारीपर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईडीनं मागितली होती 8 दिवसांची कस्टडी मागितली होती, पण त्यांना पाच दिवसांचीच कोठडी मिळाली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन

वर्धा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.. शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. 

Maharashtra LIVE Updates : कर वसुलीसाठी वसई विरार पालिका अँक्शन मोडवर

Maharashtra LIVE Updates :  वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता आणि पाणीपट्टी कर न भरणाऱ्या करदात्यांसाठी आता धोक्याची घंटा सुरु झाली आहे. पालिका आता अँक्शन मोड वर आली असून,  कर भरणा करण्याची नोटीस देऊनही त्या नोटीसला योग्य प्रतिसाद न देणाऱ्या करधारकांची पालिका मालमत्तेला सील ठोकून, लिलावात काढणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी पर्यंत अभय योजना सुरु असून, त्याद्वारे सवलतीचा लाभ घेवून, कर भरणा करण्याचं आवहान पालिकेच्या आयुक्तांनी केलं आहे. 


मार्च महिना संपायला आता अडीच महिने राहिले आहेत. त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेने महसूल उत्त्पनावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पाणीपट्टी आणि मालमत्तेचा कर न भरणा-या करदात्यांवर कारवाईचा बडगा आता पालिका उचलणार आहे. त्यामुळेच पालिकेने मालमत्ता सील करण्यासाठी 500 च्यावर कुलुपांची खरेदीच केली आहे. कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकासाठी 1 जानेवारीपासून महापालिकेने कडक धोरण राबवण्याच स्पष्ट केलं आहे. त्यातच सध्या महापालिकेने जास्त कर असणा-यासाठी अभय योजना ही सुरु केली आहे. त्याची २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, कर भरणाऱ्या करदात्यांना वेगवेगळ्या पध्दतीने सूट ही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपली मालमत्ता वाचविण्यासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरून सहकार्य करावे असे अहवानह पालिका आयुक्तांनी केले आहे.  

जरांगे यांच्या भेटीला थोड्याच वेळात शिष्टमंडळ येणार

Maharashtra LIVE Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला थोड्याच वेळात शिष्टमंडळ येणार आहे. तत्पूर्वी मराठवाडा विभागाचे विभागीय उपायुक्त अनंत गव्हाणे हे आलेले आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी त्यावर देण्यात आलेले प्रमाणपत्र आणि इतर कारवाईबाबत माहिती दिली जात आहे. 

Maharashtra LIVE Updates : माणसांची जनगणना करायला काय प्रॉब्ब्लेम आहे

सरकार कुत्र्याची जनगणना करत आहे मग यांना माणसांची जनगणना करायला काय प्रॉब्ब्लेम आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले बिहार मध्ये कशा प्रकारे जनगणना करण्यात आली हे एक समिती जाऊन पाहिल आणि त्यानंतर आम्ही राज्यात कशाप्रकारे करता येईल याचा विचार करू असं म्हणाले होतें. अजून त्यांचं काय केलेले नाही, असे प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले. 

Maharashtra LIVE Updates : कोपरगाव महंत रमेशगीरीजी महाराज अयोध्यकडे रवाना.

श्रीराम जन्मभुमी न्यासाकडून कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराजांना  मुर्तीप्राण प्रतिष्ठेचे अधिकृत निमंत्रण असल्याने महंत रमेशगिरी महाराज यांनी जनार्दन स्वामी मंदिरात दर्शन घेऊन शिर्डी एअरपोर्ट कडे रवाना झाले.. .यावेळी अयोध्यकडे रवाना होताना रामभक्तांकडून जय श्रीरामाचा जयघोष.करण्यात आला.. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी बाईक रॅलीचे आयोजन केलं होतं... हातात भगवे ध्वज घेत युवकांनी कोकमठाण ते शिर्डी बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला..  या रॅलीत युवा नेते विवेक कोल्हे देखील स्वतः बुलेट चालवत सहभागी झाले

राजन साळवींच्या घरी ईडीची झडती

राजन साळवींच्या घरी ईडीची झडती, तपासासाठी साळवींना घेऊन ईडी अधिकारी बँकेत गेले. कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Maratha Reservation: जेवढ्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या; राज्य सरकारचे आदेश

Maratha Reservation: शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारच्या वतीनं देण्यात आले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आतापर्यंत जेवढ्या नोंदी सापडल्या आहेत, त्या तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेत. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीर आयोजित करा, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

Patra Chawl Scam Case: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 16 फेब्रुवारीला होणार संजय राऊत यांच्यावर आरोपनिश्चित

Patra Chawl Scam Case: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 16 फेब्रुवारीला होणार संजय राऊत यांच्यावर आरोपनिश्चित


आरोपी खासदार संजय राऊत यांची आज कोर्टात गैरहजेरी तर सहआरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर


गुरुआशिष कंपनीचे प्रवर्तक आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना VC द्वारे कारागृहातून कोर्टापुढे हजर केलं

Rajan Salvi ACB Enquiry: उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा राजन साळवींवर आरोप; ACB कडून गुन्हा दाखल

Rajan Salvi ACB Enquiry: रत्नागिरी : आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप, त्याच अनुषंगाने रत्नागिरी एसीबी कार्यालयातून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


एसीबी  कार्यालयाने केला गुन्हा दाखल


आमदार राजन साळवी यांनी अपसंपदा जमा केल्याचा यात आरोप


राजन साळवी यांनी 3 कोटी 53 खानची अपसंपदा जमा केल्याचा एसीबीचा आरोप


राजन साळवी यांची मूळ संपत्ती 2 कोटी 92 लाख अंदाजे


ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा  जमा केल्याचा आरोप

Baramati News: बारामतीत रोहित पवारांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद

Baramati News: बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वर रोहित पवार यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उदघाटन करण्यात आलं.  यावेळी आमदार रोहित पवार यांनी पॅड आणि हेल्मेट घालून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय. यावेळी क्रिकेट खेळताना त्यांनी चौकार आणि षटकरांची आतषबाजी केलीय. तब्बल अर्धा तास त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतलाय.

Manoj Jarange: मनोज जरांगेंकडून मुंबई आंदोलनाची कसून तयारी सुरू

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी मुंबई आंदोलनाची कसून तयारी सुरू केलीय. जालन्यात ट्रॅक्टर चालवत जरांगेंनी 20 तारखेच्या मुंबई आंदोलनाचा आढावा घेतला. सरकार आज कुणबी प्रमाणपत्राचा अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. तरीही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. 


अंतरवली सराटीमध्ये 14 ऑक्टोबरला झालेल्या सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी ट्रॅक्टर चालवत आपण सज्ज असल्याचा सरकारला इशारा दिलाय. दरम्यान शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार आज अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. मात्र मनोज जरांगे यांनी अध्यादेशाअगोदर 54 लाख नोंदी सापडलेल्या समाजातील नागरिकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची त्यांनी मागणी केलीय. 

Parbhani Crime News: धारदार शस्त्रानं वार करून पतीनं पत्नीला संपवलं; परभणीच्या बोरीत सकाळीच घडला थरार

Parbhani Crime News: परभणीच्या बोरीत आज सकाळीच थरार पाहायला मिळालाय पतीने आपल्या पत्नीला धारदार शस्त्राने अनेक वार करून तिला संपवले अन थेट पोलीस ठाणे गाठले या घटनेने परभणीच्या बोरीत एकच खळबळ उडाली आहे. 


मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील राहणारा रोहित गायकवाड हा संभाजीनगर येथील एका कंपनीत कामाला आहे याने काही वर्षांपूर्वी बोरीतील सदर तरुणीशी विवाह केला होता मात्र मागच्या तीन महिन्यांपासून त्याची पत्नी ही बोरी येथील आपल्या माहेरी राहत होती त्यामुळे तो तिला घेऊन जाण्यासाठी वारंवार बोलवत होता मात्र ती जायला तयार नसल्याने आज सकाळी रोहित गायकवाड हा बोरी येथील तिच्या घरी आला आणि या दोघांत पुन्हा वाद सुरू झाला आणि सदर मुलीच्या घराजवळच रोहित गायकवाड याने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने अनेक वार केले ज्यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली त्याच अवस्थेत तिला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला असून घटनेनंतर आरोपी पती थेट पोलीस ठाण्यात हजर झाला..पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असुन पुढील तपास केला जात आहे.
Ahmednagar News: वाघे-मुरळी, गोंधळी बांधवांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

Ahmednagar News: अहमदनगरच्या पाथर्डीत जय मल्हार वाघे मुरुळी,गोंधळी सेवा भावी संस्था आणि मानधन चळवळ समितीच्या वतीने लोक कलाकवंतांना मानधन मिळावे या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पाथर्डी शहरातून काढण्यात आलेला मोर्चा हा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चातील कलावंतांनी आपले पारंपारिक वाद्य वाजवत नृत्य सादर करत मानधन मिळावे अशी मागणी शासन दरबारी केली. आपल्या मागण्या बाबत शासनाला सकारात्मकरित्या कळवले जाईल अशी आश्वासन पाथर्डी तहसील कार्यालयाकडून दिल्यानंतर हा मोर्चा विसर्जित करण्यात आला. कोरोनाच्या काळात एकल कलाकारांसाठी कमी मदत जाहीर केली असुन ती आजपर्यंत कुठल्याच कलावंताना मिळालेली नाही.याची लवकर तरतुद करावी. सध्याच्या महागाईच्या काळात कलावतांच्या पेन्शनमध्ये दप्पट वाढ  होणे गरजेचे महत्त्वाचा असून कलावंताना त्यांच्या गावात घरासाठी राखीव कोठा देऊन कामस्वरुपी मौफत रेशन वितरित करावे,लोककलावंताच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वस्तीगृह उभारण्यात यावे,लोककलावंताच्या पेन्शनसाठी जिल्ह्यात कुठलेही टार्गेट न ठेवता कलावंताना न्याय मिळावा. खऱ्या कलावंताना पेन्शन मिळत नाही त्याची शहानिशा करून मगच त्यावर कारवाई करावी.  किर्तनकार, भजणी, जागरण गोंधळ, वाघे व मुरळी, कलगीतुरा, भेदिक, लावणीसम्राट, तमासगिर, नंदीवाले, बैंडवाले, आराधी,भारुडकार, चौपदार, सेवेकरी या सर्वांना पेन्शन मिळण्यासाठी लोककलावंतासाठी वेगळे महामंडळ स्थापित करून  वयाची अट सिथलता आणावी अशा मागण्या यावेळी कलावंतांनी शासन दरबारी मांडल्या आहेत.

Badlapur News: बदलापुरात भीषण आग; खरवई एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग

Badlapur News: बदलापूर : बदलापूरच्या खरवयी एमआयडीसीमध्ये आज पहाटेच्या सुमारास व्हिके केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली या कंपनीच्या बाहेर असणाऱ्या तीन टेम्पो जळून खाक झाले आहेत, मात्र या कंपनीत असणाऱ्या केमिकलच्या टाक्या असल्याने त्या टाक्याने पेट घेत मोठ मोठे स्फोट झाले त्यामुळे तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचे हादरे बसले, तर या केमिकल कंपनीमध्ये पाच कामगार काम करत असताना चार कामगार हे जखमी झाले असून एका कामगारांचा मृत्यू झाला, मात्र व्हिके केमिकल कंपनीला आग लागल्याने आजूबाजूच्या दोन कंपनीला सुद्धा भीषण आग लागली त्यामुळे या तिन्ही कंपनीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे तर घटनास्थळी बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर अग्निशमन दल सात ते आठ गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

Pune Weather Update: पिंपरीत धुक्याची चादर पसरली, इमारती हरवून गेल्या

Pune Weather Update: पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आज चहुबाजूंनी धुक्याची चादर पसरली होती. या धुक्यात इमारती अक्षरशः हरवून गेल्या. ढग जमिनीवर अवरतल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. जणू जम्मू काश्मीरचा निसर्ग शहरात अवतरला होता. शहरवासीयांना यंदाच्या मोसमात गुलाबी थंडीची चाहूल पहिल्यांदाच अनुभवता आली. ग्रामीण भागात ही धुक्यामुळं कमालीची थंडी पसरलेली आहे. मात्र वेळ पुढं सरकत गेली अन धुक्यासह थंडीही हरवून  गेली.

Khichdi Scam Case: खिचडी घोटाळा प्रकरण; शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार

Khichdi Scam Case: खिचडी घोटाळा प्रकरण, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार


सूरच चव्हाणच्या जेजेतील वैद्यकीय चाचणीनंतर ईडीची टीम मुंबई सत्र न्यायालयाकडे रवाना


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात रिमांडसाठी हजर करणार


पुढील तपासाकरता ईडी पोलीस कस्टडीची मागणी करणार

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण 23 जानेवारीपासून सुरू होणार


महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार


या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार


त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी 20 आणि 21 तारखेला प्रशिक्षण देणार


23 जानेवारीला सुरू करून 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण संपण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना


हे सर्वेक्षण करत असताना सॉफ्टवेअर कसं वापरायचं या संदर्भात तीन दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल जाणार


हे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम करणार

Annual Status of Education Report: बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना, 'असर'चा धक्कादायक अहवाल समोर

Annual Status of Education Report: नवी दिल्ली : देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या 'असर'च्या  सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशावताराचं दर्शन घडलं आहे. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण 68 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आलेला नाही. त्यामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 


देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या 'असर' या सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशेचं दर्शन घडलं आहे. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण 68 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आलेला नाही. दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद जवळपास 21 टक्के विद्यार्थ्यांना वाचता आला नाही. इंग्रजीतील सोपी वाक्ये सुमारे 39 टक्के विद्यार्थ्यांना वाचता आली नाही. शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचं दिसत आहे. 1,200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आलं आहे. दरम्यान, 'असर' हे देशव्यापी सर्वेक्षण 'प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन'तर्फे केलं जातं. 

Rajan Salvi ACB Enquiry: एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Rajan Salvi ACB Enquiry: एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


 उत्पन्नापेक्षा देखील  118 टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख


आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी,  पत्नी आणि मुलाचा उल्लेख

Rajan Salvi ACB Enquiry: राजन साळवींच्या निवासस्थानी ACB कडून झाडाझडती

Rajan Salvi ACB Enquiry: रत्नागिरी : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार साजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या निवासस्थानी एसीबीकडून (ACB Enquiry) झाडाझडती सुरू झाली आहे. रत्नागिरीतल्या (Ratnagiri) निवासस्थानी एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सहा वेळा राजन साळवी एसीबी चौकशीसाठी अलिबाग (Alibag) येथील कार्यालयात हजर राहिलेत. 

Ram Mandir Pran Pratishtha: क्रेनच्या मदतीनं राम मंदिर परिसरात पोहोचली रामललाची मूर्ती; आज गर्भगृहात स्थापना

Ram Mandir Pran Pratishtha: येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामललाच्या अभिषेकचा मुहूर्त जवळ आला आहे. अयोध्येत भक्तांची रेलचेल वाढली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी तयारी सुरू असून  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी (17 जानेवारी) या विधींच्या दुसऱ्या दिवशी रामललाची मूर्ती मंदिर परिसरात नेण्यात आली होती. अशातच आज मूर्ती मंदिरातील गर्भगृहात ठेवली जाणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.