Maharashtra News Updates 29 November 2022 : देवेंद्र फडणवीसांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा; अॅड. रवी जाधवांचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना आंदोलन करता येणार नाही
९/११/२२ पासून पुढची सहा महिने एसटी महामंडळची सेवा लोकोपयोगी म्हणून घोषीत
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ कलम २ (एन) (६) अंतर्गत लोकोपयोगी सेवा जाहीर
शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अधिसूचने प्रमाणे कारवाई
औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ मधील कलम २ (एन) (६) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे रा. प. महामंडळाची सेवा दि. ०९.११.२०२२ पासून पुढील ६ महिन्याच्या कालावधीकरीता "लोकोपयोगी सेवा" म्हणून घोषित केलेली आहे.
सदर अधिसूचना सोबत जोडली असून, त्याची प्रत आगार /विभाग/ बसस्थानकाच्या सूचना फलकावर लावून सर्व कर्मचा-यांच्या नजरेस आणून द्यावी.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्री. माने यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.
या समितीच्या सदस्यपदी ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर तर विशेष निमंत्रीत म्हणून ॲड. र. वि. पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव हे विशेष निमंत्रीत असून सीमा प्रश्न विषयी काम पाहणाऱ्या विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
कल्याण पश्चिम गौरी पाडा येथील सर्वोदय इमारतीमधील एका घरात गॅस लिकेजमुळे स्फोट झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.दरम्यान या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नाव आहेत . दोघी सासू सूना आहेत .याच दरम्यान घरात बेडरूम मध्ये एक महिला व तिचे दीड महिन्याचा बाळ होते मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही .अग्निशमन विभाग व स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले ..मात्र या स्फोटात किचन चे नुकसान झाले आहे .घरी स्वयंपाक करताना गॅस लिकेज मुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. गॅस लिकेज मुळे हा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
धाराशिव शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांचा मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश
सोनिवली परिसरातील गोल्डन व्हॅली भागात मागील चार वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या आहे. इथल्या नागरिकांना दिवसातून फक्त १० मिनिटं पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्यातही कमी दाबाने पाणी येणं, पाण्याच्या ऐवजी नुसतीच हवा येणं अशा समस्या नागरिकांना भेडसावतात. पाणीच नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा भागवताना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत मागील ४ वर्षात नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अनेकदा तक्रारी आणि पाठपुरावा करूनही नागरिकांची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आज अखेर गोल्डन व्हॅली भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात गोल्डन व्हॅली परिसरातील भागातील महिला, पुरुष, वृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिकामे हंडे आणि कळशा वाजवत या नागरिकांनी मजीप्रा कार्यालयावर मोर्चा काढला. तसंच कार्यालयाच्या आवारातच ठिया देखील दिला. अखेर नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर नागरिकांनी मोर्चा स्थगित केला.
आज ऊस दरा प्रश्नसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विविध शेतकरी संघटनेच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.
ऊसदर प्रश्नासंदर्भात राज्य सरकार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक ते दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर केंद्र सरकारच्या १९६६ च्या नुसार शेतकऱ्यांना ऊसाचा एफ.आर.पी. हा एकरकमी देण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत राज्य शासनाने घेतला. त्या बद्दल रयत क्रांती संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.
तसेच दोन कारखान्यांमधील असलेले २५ किलोमीटरचे हवाई अंतर देखील काढणे बाबत सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित मान्यवरांना आश्वासित केले.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, मंत्री दादा भुसे, रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत, रयतचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, शिवनाथ जाधव, शिवाजी माने व इतर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Jitendra Awhad : 'हर हर महादेव' चित्रपटादरम्यान विवियाना मॉल येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मी त्या ताईचा आभारी आहे, की त्या ताईने स्वत:हून सांगितले, की मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा असे जीतेंद्र आव्हाड म्हणाले.
Rupali Chakankar : श्रद्धा वालकरची हत्त्या ही निंदनीय असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या संपूर्ण घटनेचा तपास फास्टट्रॅक कोर्टामध्ये व्हावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे केली आहे. पुन्हा एखादी श्रद्धा वालकर होऊ नये यासाठी राज्यातील सर्व बेपत्ता मुलींच्या संदर्भात युद्ध पातळीवर काम करत आहोत. राज्य महिला आयोगाच्या वतीने एक समिती नेमून मिसिंग मुलींना ट्रेस करून पाठपुरावा केला जाईल असेही त्या म्हणाल्या.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका इसमाचा गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .
घाटकोपर येथून निघालेली ही बस राजस्थान मधील उदयपूर येथे जात असताना चारोटी टोलनाक्याजवळ ही घटना उघडकीस आली. घोडबंदरला बस मध्ये बसलेल्या एका अनोळखी प्रवासाच्या मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने सहप्रवासी आणि बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं . मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं असून या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं उघडकीस आला आहे . यानंतर कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रवासाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे .
रब्बी हंगाम सुरू झाला असून रब्बी पीक जगवण्यासाठी विजेची आवश्यकता आहे मात्र वीज वितरण कंपनी कडून कृषी पम्पा करिता भारनियमन मोठ्या प्रमाणात होतय. १२ ते १८ तासाच्या लोडशेडिंगमुळे शेतकर्यांना रात्री पाणी देण्याची वेळ आली आहे. तर अनेक ठिकाणी रोहित्र नादुरुस्त आहे त्या मुळे सिंचन रखडत असल्याने उभे पीक पाण्याअभावी सुकत आहेत. जिल्ह्यात 180 रोहित्र नादुरुस्त आहेत तर 8 रोहित्र महावितरण कम्पनी कडे चालू स्थितीत आहेत आणि ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रोहित्र न मिळाल्याने सिंचनाचा प्रश्न कायम असल्याने खरीप पिकां बरोबर रब्बी पीक ही सिंचना अभावी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. महावितरणने दिवसाची लोडशेडींग बंद करून विद्युत रोहित्र उपलब्ध करून देण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत..
येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथे राज्यभरातून आलेले तीन लाखांहून अधिक भाविक खंडोबा चरणी नतमस्तक झाले.. याठिकाणी भंडा-याची उधळण करत देवाची तळीआरती केली जाते.. देवाला वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य भाविक अर्पण करत असतात.. जेजुरीहून निघाल्यानंतर खंडोबा महाराजांचा पाचवा मुक्काम वाकडी येथे झाला. वाकडीत पाण्याची सोय नसल्याने प्रधानजींना त्यांनी चंदनापुरी येथे पाणी आणण्यासाठी पाठवले.. पाण्याची उपलब्धता नसल्याने सर्व सैन्य त्यांनी जेजुरीला परत पाठवले. मात्र जाताना घोड्यांच्या माना वाकड्या झाल्याने या जागेला वाकडी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.. त्यामुळे प्रत्येक चंपाषष्टीला मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात
जालना तालुक्यातील मौजपूरी येथे कोणतीही डिग्री नसताना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या एका बोगस डॉक्टर वर आरोग्य पथकाने आणि पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलंय या बोगस डॉक्टर कडे काही विना परवाना औषधांचा साठा देखील आढळून आला असून,या ठिकाणावरून इंजेक्शन, अँटिबायोटिक्स तसेच वेदनाशामक औषधे आरोग्यपथकांने जप्त केलेत, या प्रकरणी पोलिसांनी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांच्या तक्रारी येत असून अशा डॉक्टरांकडून उपचार न घेण्याच आवाहन आरोग्य विभागाने केलंय
Raj Thackeray : कोणताही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. बालेकिल्ले कुणाचे हालत नाहीत असं नसतं, इथला बालेकिल्ला देखील हालेल. मी केवळ माझ्या पक्षासाठी काम करतो कुणासाठी काम करत नाही. अनेक वेळा कम्युनिकेशन गॅप असतो, तो भरून निघतो, कधी निघत नाही. सीमाभागाचा प्रश्न आताच कसा बाहेर येतो? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, असा अर्ज जमीनच्या व्यवहारात मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, असा अर्ज जमीनच्या व्यवहारात मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर स्टॅम्प घोटाळा प्रकरणात चौकशी करा, असा अर्ज जमीनच्या व्यवहारात मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी सतीश उके यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.
Narayan Rane : सावरकरांबाबत उद्धव ठाकरेंना सन्मान आहे का? असा सवाल पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला. तसेच, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली. 'अडीच वर्षात उद्योग किती गेले याबाबत कुणीही बोलत नाही. आता चार महिन्यात उद्योग केले याबाबत बोलू लागलेयत. असे वक्तव्य नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार, अशी बातमी समोर येत आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Ahmednagar News: अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अविनाश चव्हाण नावाच्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या युवकाकडे सापडलेल्या चिठ्ठीत तो श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील असल्याचे समोर आले आहे. वैयक्तिक कारणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याच्याजवळील पत्रातून समोर येत आहे. सध्या या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shivsena: निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरील पहिली सुनावणी 12 डिसेंबर रोजी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटाला सुनावणी आधी लिखित बाजू मांडण्यासाठी 9 डिसेंबरची मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे.
Maharashtra News: राष्ट्रवादीकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी दिंडीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेत उद्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आले असून उद्या दुपारी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Pandharpur News : विठ्ठल मंदिर परिसरात 120 मीटर रुंदीचा माऊली कॉरिडॉर करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात नागरिक आणि व्यापाऱ्यात मोठी दहशत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यापूर्वीच नागरिकांनी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्याने आता मंदिराकडे येणारे रस्ते भव्य आणि मोठे दिसू लागले आहेत. माऊली कॉरिडॉर झाला तर जवळपास 600 निवासी आणि 416 व्यापाऱ्यांच्या मालमत्ता बाधित होणार आहेत. सध्या येथील रास्ता 40 फूट रुंदीचा असून माऊली कॉरिडॉरनंतर जवळपास 360 फूट रुंदीचा रास्ता येथे प्रस्तावित आहे. हा कॉरिडॉर झाला तर आपल्याला इथून कायमचे जावे लागेल ही भावना व्यापाऱ्यांची बनल्याने प्रत्येकाने आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
Nandurbar News : राज्य सरकारने राज्यभरात पोलीस भरती जाहीर केली आहे. त्या पोलीस भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अर्ज दाखल करण्यासाठी तालुक्याच्या गावी किंवा मोठ्या गावी येत आहेत. मात्र सर्व्हर चालत नसल्याने किंवा वेबसाईट बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी रात्रभर प्रतीक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असल्याने लागले असल्याने विद्यार्थी आणि इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी एकाच ठिकाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
Hingoli News : उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील दोन ते अडीच लाख नागरिकांना गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपकावर घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून ज्या घरी राहत आहोत ते घर सोडून ऐनवेळी जायचं कुठे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक घरकुल योजनेमधील लाभार्थी आहेत. नागरिकांना शासनाच्या वतीने याच जमिनीवर घरकुल सुद्धा बांधून देण्यात आली आहेत. परंतु ती घरकुल सुद्धा रिकामे करण्याची नोटीस प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आली आहे. यामध्ये सरकारने लक्ष घालावे आणि नागरिकांच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
Monkeypox Name Change: कोरोना पाठोपाठ जगभरात मंकीपॉक्सनंही (Monkeypox) थैमान घातलं होतं. मानवासाठी धोकादायक अशा मंकीपॉक्सला आता मात्र नवं नाव देण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स आजाराचं नाव बदललं आहे. सोमवारी (28 नोव्हेंबर) रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्सचे नाव बदलून 'एमपॉक्स' (MPOX) असं जाहीर केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, दोन्ही नावं सुमारे एक वर्ष वापरली जातील आणि नंतर मंकीपॉक्स या नावाचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद होईल.
Kolhapur News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला (kolhapur) पोहोचतील. तब्बल पाच वर्षानंतर राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची कोल्हापूरकरांनी जोरदार तयारी केली आहे. आज राज ठाकरेंना पंढरपुरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापुरात विश्रामगृहावर भेटणार आहे. दरम्यान, राज ठाकरे हे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा देखील करणार आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शिवप्रताप दिन उत्सवाच्या निमित्ताने 29 आणि 30 नोव्हेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर होणार आहेत. आज दुपारनंतर मुख्यमंत्री मुक्कामी महाबळेश्वर मध्ये येणार आहेत. त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याबरोबरच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत..
साताऱ्यात शिवप्रताप दिन विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार
शिवप्रताप दिन उत्सवाच्या निमित्ताने 29 आणि 30 नोव्हेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर होणार आहेत. आज दुपारनंतर मुख्यमंत्री मुक्कामी महाबळेश्वर मध्ये येणार आहेत. तर 30 तारखेला ते गडावर स्वतः हजर राहून छत्रपती शिवरायांच्या नावाचा झेंडा बुरुजावर झळकवणार आहेत.
राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला पोहचतील. पंढरपूरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापूर विश्रामगृह येथे राज ठाकरे यांना भेटणार आहेत.
पुण्यातील रिक्षा संघटना राज ठाकरेंची भेट घेणार
पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनातील रिक्षा संघटनांची कृती समिती राज ठाकरेंची भेट घेणार आहे.
जेजुरीच्या खंडेरायाची चंपाषष्ठी यात्रा
महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा पार पडतात. मात्र विजयाचं महाप्रतिक असणाऱ्या चंपाषष्टी यात्रेला राज्यभर वेगेळे स्थान आहे. खंडेरायाच्या जेजुरी गडावर सहा दिवस घट स्थापन करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी यात्रेची आज वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य देवाला दाखवून घट उठवून सांगता होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल होत असतात. जेजुरीच्या प्रत्येक घरातील लोक हा नेवैद्य घेऊन जातात.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांनी सीबीआय केसमध्ये जीमानासाठी अर्ज दाखल केलाय.
नांदेडमध्ये लव्ह जिहाद विरोधात जिल्ह्यात हिंदू संघटना रस्त्यावर उतरणार
देशातील वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणा संदर्भात सरकारने कडक कायदे करून कठोर भूमिका घ्यावी व नांदेड येथील स्वप्नील नागेश्वर या तरुणाचा प्रेम संबंधांतून विशिष्ट समुहातील टोळक्याने केलेल्या हत्येच्या निषेधार्थ, विश्वाहिंदू परिषद, बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 1 वाजता रॅली काढणार आहेत.
अमरावतीत राष्ट्रीय संत संमेलन
अचलपूर येथे आजपासून 8 डिसेंबर पर्यंत एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ आणि श्रीराम कथा आणि राष्ट्रीय संत संमेलन होत आहे. यावेळी देशभरातून जवळपास 500 साधुसंत येणार आहेत. अचलपूर येथील बालाजीपूरम चांदूरबाजार रासेगाव रोड सुलतानपूरा येथे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत आचार्य सुदर्शनजी महाराज वृंदावन यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी 6 ते 8 एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ आणि दुपारी 2 ते 6 आंतरराष्ट्रीय श्रीराम कथा प्रवक्त्या श्री श्री 1008 श्रीमहंत श्रीराम मोहनदासजी रामायणी महाराज हिमाचल प्रदेश यांच्या दिव्य वाणीतून श्रीराम कथेला प्रारंभ होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -