Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीची मोठी तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्याचबरोबर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपुर्वी (गुरुवारी 31 ऑक्टोबरच्या) पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


पुण्यात अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. आज आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.




प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया


प्रकाश आंबेडकरांची भेटी घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांची तब्येत आता बरी आहे आणि ते 9 तारखेपासून प्रचाराला सुरूवात करणार आहेत, असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.


भेटीवेळी आमच्या इतर काही गप्पा झाल्या नाहीत. या गप्पा अर्ज माघारी घेण्याआधी होण्याची शक्यता असते. पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असंही पुढे अजित पवारांनी सांगितलं आहे.