NAMO Shetkari Maha Sanman Nidhi Maharashtra: राज्यात आजपासून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यंदाच्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या सहा हजार रुपयांसह राज्य सरकारचे सहा हजार रुपये जमा होतील. म्हणजे वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होतील. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील एक कोटी नागरिकांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan Samman Nidhi) या धर्तीवर ही योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आता एका रुपयात पीक विमा मिळणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
या आधी राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी पंजाबराव देशमुख मिशन लागू होतं, आता ते संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आलं आहे. या योजनेचा फायदा राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी 1900 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी नेमका काय? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)
- नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
- या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
- केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
- याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
- यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली येणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. 3 वर्षांत 1000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: