अकोला : अकोला जिल्ह्यातील वडगाव इथल्या जात पंचायतीने महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याप्रकरणी दहा पंचांवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण तपासासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांकडे वर्ग केलं आहे. जात पंचायतीमधील एकनाथ शिंदे, प्रेमनाथ शिंदे, गणेश बाबर, शिवनाथ शिंदे, किसन सावंत, दिनेश चव्हाण, काशिनाथ बाबर, कैलास शिंदे, कैलास सावंत, संतोष शेगर या दहा पंचांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.


अनेक कायदे केले तरी जात पंचायतीने दिलेल्या विकृत शिक्षांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 9 एप्रिल 2021 रोजी जातपंचायतीमध्ये थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याचा आरोप पीडितेना केला आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केल्याच्या कारणावरुन जातपंचायतीने संबंधित महिलेला ही शिक्षा दिली.


काय आहे प्रकरण? 
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वडगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पीडित महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह जात पंचायतीने अमान्य केला आणि पंचांनी तिला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. 


महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारु, मटणावर ताव मारला आणि त्या परिवारास जातीतून बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत राहावे, असा हेका पंचांनी कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे आणि त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडवले. 


डॉ. निलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
या प्रकरणी आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे. अशा घटना सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत. घटना घडल्यानंतर प्रथमतः तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करण्याकरता प्रयत्न करावा अशी मागणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे.


घटना नोंद झाल्यानंतर तक्रार नागरी हक्क संरक्षण कक्षाकडे ताबडतोब देऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासाठी वेळेचे निर्बंध घालून देण्यात यावे. जात पंचायतीच्या केसेचा आढावा PCR नागरी हक्क संरक्षण पोलीस महानिरीक्षक यांनी दर पंधरा दिवसाला घेतला तर अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल. पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सर्व जात पंचायतीच्या पंचांची माहिती गोळा कडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात यावी असंही डॉ. निलम गोऱ्हे यांनी या पत्रात म्हटलं आहे.