Lok Sabha Preparation From BJP: कर्नाटकामध्ये भाजपचा (BJP) दारूण पराभव झाला असून, काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील झालेल्या पराभवानंतर भाजप लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) कामाला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, देशभरातील सर्व भाजप खासदारांना (BJP MP) 30 मे ते 30 जूनपर्यंत आपल्या मतदारसंघात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यात त्यांनी नागरिकांशी भेटावं, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मुक्काम करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी याबाबत 'एबीपी माझा'ला माहिती दिली आहे. 


याबाबत बोलताना भागवत कराड म्हणाले की, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व खासदारांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यात 30 मे ते 30 जून या कालावधीत सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघात काम करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत. यात्रा किंवा संपर्क अभियानाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. 


असं असणार संपर्क अभियान....



  • संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे संघटन करण्यात येणार.

  • त्या भागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केले जाणार.

  • नागरिकांचे प्रश्न कसे सोडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार.

  • त्या भागातील लाभार्थी असलेल्या लोकांची भेटी घेऊन, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार.

  • वरील सर्व कामे कार्यकर्त्यांना देण्यात येणार असून, महाराष्ट्रभर असेच संपर्क अभियान राबवले जाणार आहे. 


कर्नाटकातील दारुण पराभवानंतर भाजप लागली कामाला...


कर्नाटकामधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवल्याने एकहाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर भाजपला 66 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. 2014 नंतर काँग्रेसने पहिल्यांदाच भाजपचा एवढा मोठा पराभव केला आहे. त्यामुळे याचे परिणाम आता लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार सल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपने निकालाच्या दुसऱ्या दिवशीच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधी यांना दिल्या आहेत. दरम्यान राज्यभरातील सर्वच खासदारांना 30 मे ते 30 जूनपर्यंत आपापल्या मतदारसंघात राहण्याचे आणि विधानसभा मतदारसंघात मुक्काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच कर्नाटकातील दारुण पराभवानंतर भाजप कामाला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Eknath Shinde: राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा