रत्नागिरी : सतत बदलणार वातावरण, या वर्षी वर्षभर पडत असलेला अवकाळी पाऊस, तापमान वाढ यामुळे कोकणी मेव्यावर परिणाम झाला आहे. कोकणात आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळ अशी विविध फळपीक उन्हाळ्यात मिळतात. मात्र यंदा लहरी वातावरणाच्या कचाट्यात ही फळ अडकल्याने याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. कोकणात गेली काही वर्ष येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबाग उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे कोकणचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. कोकणातील शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात अडकले आहेत. कोकणची खरी ओळख आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळ पिके आहेत. कोकणात आंबा, काजू पिकांखाली हजारो हेक्टरने क्षेत्र वाढले. याशिवाय कोकम, जांभळासारख्या फळपिकांचीही लागवड होऊ लागली आहे. मात्र कोकणातील शेतकऱ्यांवर ऋतुचक्रच बद्दल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. फळपिकांच्या दृष्टीने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू खूप महत्त्वाचे आहेत. मात्र जून ते सप्टेंबरपर्यंत चालणारा पावसाळा आता प्रत्येक महिन्यात पाऊस कोकणात पडत आहे. त्यामुळे ऋतुचक्र बदलाचा सर्वाधिक फटका फळपिकांना बसत आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फुलकिडे, तुडतुडे, फळमाशी, बुरशी यासारख्या किडरोगांचा प्रादुर्भाव गेल्या तीन-चार वर्षांत वाढला आहे. त्यामुळे बागांचे व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना कठीण बनत चालले आहे. 


कोकणात यावर्षी आंबा सरासरीच्या 30 ते 35 टक्के तर काजू 20 टक्के उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. कोकम, जांभुळ, करवंद ही पीक नावालाही दिसेनासे झाली आहे. काही ठिकाणी कोकम पीक मिळत असल तरी ते अत्यल्प प्रमाणात आहे. प्रामुख्याने कोकणात एप्रिल, मे महिन्यात चाकरमानी कोकणी रानमेवा खाण्यासाठी कोकणातील गावागावात येतात. मात्र यंदा कोकणची काळी मैना म्हणून ओळख असलेली जाभुळ, करवंद नावालाही दिसेनासी झाली आहेत. यावर्षी तर आंब्याला मोहोर येण्याच्या कालावधीत नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडल्याने नुकसान झाले. त्यानंतरही सातत्याने अवकाळी पाऊस पडत असल्याने आंबा, काजूच्या पिकावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.


कोकणात गेल्या काही वर्षांत सतत होणाऱ्या बदलामुळे आंबा, काजू पिकांना फटका बसत आहे. मात्र कोकणात असलेल्या कोकण कृषी विद्यापीठाने यावर संशोधन करून बदलत्या वातावरणानुसार कोकणातील शेतकऱ्यांना कश्या पध्दतीने फळबागा टिकवून उत्पादन घेता येईल यावर संशोधन केलं पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30 हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली तर 72 हजार हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली आहे. या दोन्ही पिकांची उलाढाल साधारणपणे 20 हजार कोटींच्या आसपास आहे. लाखो शेतकरी या दोन फळपिकांवर त्यांचं वर्षाचं आर्थिक गणित अवलंबून असत. 


कोकणात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंब्यावर वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव सर्रास होतो. त्यावर कीटकनाशक फवारून देखील त्याचा काही परिणाम होत नाही. महागडी कीटकनाशके फवारून देखील त्याचा उपयोग होत नाही. सध्याचे वातावरण फळबागांसाठी धोकादायक असून अशीच परिस्थिती राहिल्यास कोकणातील शेतकरी कर्जबाजारी होईल. त्यामुळे सतत बदलत असलेल्या वातावरणाचा थेट फटका कोकणी मेव्यावर होतोय. कोकणची अर्थव्यवस्था असलेल्या आंबा, काजूवर याचा थेट परिणाम होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 


आंबा, काजु, कोकम, जाभुळ, करवंदाच्या उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या इतर उत्पादनावर होत आहे. आंब्यापासून आंबा पल्प, आंबा पोळी, काजु पासून काजुगर, काजूच्या तुटलेल्या गरापासून अनेक उत्पादने तयार केली जातात. कोकम पासून सरबत, आगळ तर करवंदापासून लोणचं, सरबत ही उत्पादने महाग होण्याची शक्यता आहे.