Galgaon  Paralysis Attack : राज्यातीक अनेक भागात सध्या मोठ्या प्रमाणात तापमाणात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आहे. या लाटेच्या दुष्परिणामामुळे काही जणांना पक्षाघाताचा (अर्धांगवायू ) झटका आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आले आहे. वाढत्या तापमानात पुरेसे पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे रक्तात गुठळ्या तयार होऊन पक्षाघाताचा झटका येऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


सध्या जळगाव जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं 'एबीपी माझा'च्या पाहणीत दिसून आले आहे. पक्षाघात होण्याची अनेक कारणे आहेत. शिवाय कोणत्याही वयोगटामधील व्यक्तीला पक्षाघात होऊ शकतो. मात्र, वाढत्या उन्हात फिरल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्याचा थेट परिणाम मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर होत असतो. त्यामुळे मेंदूला इजा पोहोचून त्यामुळे पक्षाघात होण्याच्या घटना सध्या जळगाव जिल्ह्यात समोर येत आहेत.


कोणताही मोठा आजार नसताना केवळ उन्हात फिरमुळे अनेक तरुणांना उलट्या, डोके दुखी,चक्कर येणे आणि त्यानंतर पक्षाघात झाल्याच्या घटना तरुण वर्गात दिसत आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यात विविध खासगी रुग्णालयात वीस ते पंचवीस तरुण अशा प्रकारच्या पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यावर उपचार घेताना दिसून येत आहेत. अजूनही आगामी काळात अशा घटनांमध्ये वाढ होण्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.


 मेंदू विकार तज्ञांच्या मते, कोणतीही व्यक्ती उन्हात फिरल्यानंतर पक्षाघाताचा झटका येतो असे होत नसते. मात्र, काही व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या रक्तात गुठळ्या तयार होण्याची शक्यता असते, अशा व्यक्ती जर कमी प्रमाणात पाणी पिऊन उष्ण वातावरणात राहात असतील तर त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी आणि रक्तामधील पाणी कमी होत असल्यामुळे अशा व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या तयार होतात. या गुठळ्या मेंदूला रक्त पुरवठा करताना अडचणी निर्माण करत असल्यामुळे मेंदूला कमी प्रमाणात रक्त पुरवठा होतो. त्यामुळे अशा व्यक्तींना विनस थरंबोसिस  प्रकारातील पक्षाघात होत असल्याचे मेंदू विकार तज्ञ सांगतात. याच प्रकारातील पक्षाघात सध्या तरुण वर्गात जास्त प्रमाणात आढळून येत आहे, अशी माहिती मेंदू विकार तज्ञ डॉ. तेजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. 


डॉ. तेजेंद्र चौधरी यांच्या रुग्णालयात सध्या बत्तीस वर्षीय योगिता ननवरे या ग्रामसेविका उपचार घेत आहेत. त्या मूळच्या जळगाव शहरातील रहिवासी आहेत. मात्र, नोकरी निमित्ताने त्यांना रोज रावेर  येथे जावे लागते. बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे त्या रोज जळगावहून  दुचाकीवरून भर उन्हात रावेर जात होत्या. मात्र, गेल्या आठ दिवसांत उष्णतेची लाट वाढली असतानाही त्यांनी आपला कामाचा व्याप सांभाळताना भर उन्हात काम करणे पसंत केलं होतं. मात्र, याच काळात शरीराला जेवढं पाणी आवश्यक होतं ते त्यांच्या पिण्यात न आल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे त्यांना विनस थरमबोसिस प्रकारातील प्यारालिसिसचा झटका आला आहे. 


प्यारालिसिसचा झटका येण्याआधी एक दिवस त्यांना डोके दुखी अशक्तपणासारखा त्रास जाणवत होता. मात्र, त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे काम करत असताना त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यात त्यांच्या एका हाताला आणि पायाला प्यारलीसिसचा झटका आला होता. मात्र, वेळीच उपचार घेतल्याने योगिता यांची प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. वाढत्या उन्हात आपण कामानिमित्ताने बाहेर फिरल्याने आपल्याला हा त्रास झाला असल्याचं योगिता ननवरे यांनी सांगितलं. 


जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी पक्षाघात होण्यामागील कारणे सांगितली. पक्षाघात होण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील वाढत्या तापमानात फिरल्याने शहरातील पाण्याची पातळी कमी होऊन मेंदूला इजा पोहोचून पक्षाघात किंवा माणसाचा अकस्मात  मृत्यू होण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटल आहे. उष्माघाताचा किंवा पक्षाघाताचा धोका टाळायचा असेल तर  दुपारच्या वेळात भर उन्हात जाणे  टाळले पाहिजे, सैल आणि सूती कपड्यांचा वापर करावा, तहान असो अथवा नसो भरपूर पाणी पीत राहायला हवे अशी काळजी घेणे गरजेचे असल्याचं डॉ. पाटील यांनी म्हटलं आहे. 


जळगाव जिल्हा रुग्णालयात प्यारालीसिस संदर्भात आधुनिक उपचार पद्धती नसल्याने कोणताही रूग्ण सध्या दाखल नाही. शासकीय पातळीवर याबाबत पूर्णपणे अनभिज्ञता असून जिल्हा रुग्णालयात वाढत्या उन्हामुळे आलेल्या रुग्णांच्यासाठी उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी एकही रूग्ण दाखल नाही.