Hingoli News: सरकार बदलल्यावर जुन्या सरकारच्या निर्णयांना स्थगिती देणं हे काही आता नवीन राहिले नाही. दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावर नवीन आलेल्या शिंदे-फडणवीस सरकराने देखील ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना आणि कामांना स्थगिती दिली असल्याचा आरोप केला जात आहे. याचवेळी हिंगोली जिल्ह्यात देखील असेच काही पाहायला मिळत आहे. कारण गेल्या सरकारमध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली 42.71 कोटींचे 99 कामे एका फटक्यात रद्द करण्यात आली आहे. 


महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये समितीच्या सदस्यांनी सुचवलेल्या 72.71 कोटी रुपयांच्या 99 कामांना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली होती. मात्र सरकार बदलताच या कामांना ब्रेक लागला असून, ही कामे रद्द करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी चालू आर्थिक वर्षात विविध विकासकामांसाठी 200  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आता गेल्या सरकारच्या काळातील 42.71 कोटींचे 99 कामे रद्द करण्यात आली आहे. 


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2022-23 या वर्षासाठी 200  कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 51 कोटी 50 लाख व आदिवासी उपयोजनेसाठी 18 कोटी 71 लाख 71 हजार असे एकूण 270 कोटी 21 लाख 71 हजार रुपयांचा नियतव्यय मंजूरी देण्यात आली आहे. पण यावेळी जुन्या कामांना मात्र ब्रेक लावण्यात आला आहे. तर येत्या मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून 200 कोटींवरून 250  कोटींपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याच सत्तार म्हणाले होते. 


महाविकास आघाडीला धक्का...


महाविकास आघाडीची सत्ता असतांना तत्कालीन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी तिन्ही पक्षातील लोकप्रतिनिधी यांच्या मागण्या लक्षात घेत विविध 99  विकास कामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र सत्ता बदलताच आता ते कामे रद्द करण्यात आले आहे. ज्यात एकूण 42.71 कोटींचे 99 कामे रद्द करण्यात आली आहे. आता नवीन कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे.