Marathwada Unseasonal Rain : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात (Marathwada) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागात गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे तब्बल 153 गावांत नुकसान झाले आहे. तसेच 8 हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाला. 147 जनावरे, 1178 कोंबड्या दगावल्या आहे. त्याचप्रमाणे एकूण 54 घरांची पडझड झाल्याची माहिती विभागीय प्रशासनाकडून मिळाली आहे. विभागातील आठ जिल्ह्यांतील दहा सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
'या' भागात अतिवृष्टीची नोंद
मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतील एकूण 10 सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 5 , धाराशिव 2 ,बीड 2 , जालना 1 सर्कलमध्ये अतिवृष्टीची झाली आहे. ज्यात लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोरोल येथे 135 मि.मी. पाऊस झाला आहे. तांदुळजा 87.8 मी.मी. किल्लारी 87.00 मी.मी., हलगरा 65.00 मी.मी., नागलगाव 87.75 मी.मी., तर जालना जिल्ह्यातील तेलानी 74.50 मी.मी., बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई, पाटोदा तालुक्यात 91.50 मी.मी., बर्दापूर येथे 67.75 मी.मी., उस्मानाबाद जिल्ह्यातील श्रीढोण 66.25 मी.मी. आणि नारानगावडी येथे 87.00 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
असे झालं नुकसान!
- अवकाळी पावसात वीज पडून आणि इतर कारणाने दहा जणांचा बळी घेतला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 6 , परभणीतील 3, बीडमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.
- अवकाळी पावसात 64 लहान, 83 मोठी जनावरे आणि 1178 कोंबड्या दगावल्या आहेत.
- अवकाळी पावसात 54 कच्चा घरांची अंशत: पडझड झाली आहे.
- अवकाळी पावसात एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे, तर 6 झोपड्या आणि 1 गोठ्याचे नुकसान झाले आहे.
- लातूर जिल्ह्यात 26 ते 28 एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामध्ये 29 पशुधनाचे नुकसान झाले आहे. 20 कोंबड्याही दगावल्या आहेत.
सोयगावात 65 घरांवरील पत्रे उडाले
शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांना देखील बसला आहे. दरम्यान सोयगावसह तालुक्याला शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी दोन तास अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यावेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सोयगाव शहरातील 65 घरांवरील पत्रे उडाली असून एक शेड पूर्णपणे कोसळले आहे. सोयगाव शहरासह परिसरात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. यावेळी वादळी वारे सुटल्याने शहरातील आमखेडा भागातील 65 घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच एका हॉटेलचे शेड उडाले. रावेरी शिवारातील अंजनाई गो शाळेवरील पत्रेही उडून गेले. सोयगाव-जरडी रस्त्यावर विद्युत पोल कोसळला. अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या. जुन्या पोस्ट ऑफिसजवळील गोठ्यांवरील पत्रे उडून दूरवर जाऊन पडले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: