मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी मुंबई सत्र न्यायालयानं 22 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 22 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांच्यावतीन वकील कुशल मोरे यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत केवळ चार दिवसांची वाढ केली.
'ईडी' ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे 'ईडी' ला तपासात आढळलं आहे. त्यानुसार 'ईडी' नं कारवाई करत मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. याआधी न्यायालयाने मलिक यांना 'ईडी' कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपत असल्यानं मलिक यांना सोमवारी मुंबई सत्र न्यायालायातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं.
मलिकांना मुत्रपिंडाचा त्रास
आपल्याला मुत्रपिंडाचा (किडणी) त्रास असून त्यामुळे पायाला सूज आल्याची माहिती मलिक यांनी न्यायाधीश राहुल रोकडे यांना दिली. तसेच पाय दुखत असल्याचे कारागृह प्रशासनाला सांगितले असता वेदनाशामक (पेनकिलर) औषधे दिली जातात. मात्र, या आजारावर कायमस्वरुपी उपाय करणं आवश्यक असल्याचंही मलिक यांनी पुढे कोर्टाला सांगितलं.
संबंधित बातम्या :