मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने पुन्हा एकदा दणका दिला आहे. ईडीने नवाब मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्या आठ संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्ता बहुतांश मुंबईतील आहेत. यामध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.


ईडीने नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ईडीने फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगसोबत मलिक यांचं कनेक्शन असल्याचा ईडीचा आरोप आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तात्काळ सुटकेसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.


नवाब मलिक यांच्या कोणकोणत्या मालमत्तेवर टाच?


कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, 
कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स
कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड
वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स
उस्मानाबादमधील 148 एकर जमीन 


23 फेब्रुवारीपासून नवाब मलिक अटकेत 


'ईडी'ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचं ईडीला तपासात आढळलं आहे. त्यानुसार ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. मात्र ईडीने केलेली आपली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत ईडीने नोंदवलेला गुन्हा आणि पीएममएलए न्यायालयाच्या आदेशला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. आपली तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका नवाब मलिक यांनी दाखल केली होती. आपल्या विरोधात निव्वळ राजकीय सूड उगविण्यासाठीच केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर होत असल्याचंही मलिक यांनी या याचिकेत म्हटलं होतं. परंतु हायकोर्टातही दिलासा न मिळाल्याने नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.