मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्यावर  स्वत : जातीनं लक्ष ठेऊन आहेत. राज ठाकरेंचा मुद्दा व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे कारण शेवटी मनसे आणि शिवसेनेचं बेरीज वजाबाकीचं गणित आहेत.  राज ठाकरेंच्या भोंगा प्रकरणावरून किती वजन द्यायचं की तातडीनं काही आदेश काढून राज ठाकरेंचं भोंगा प्रकरण मिटवायचं यावरून मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर दबाव असल्याची माहिती समोर येत आहे. कारण राज ठाकरे जाहीर सभेत शरद पवारांवर जरी टीका करत असले तरी याचा फटका शिवसेनेला जास्त बसण्याची शक्यता आहे. हे प्रकरण जसजसं चिघळेल तसे राज ठाकरे मोठे होऊ शकतात आणि हे सगळं शिवसेनेला डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


जेव्हापासून राज ठाकरेंनी भोंग्याचा विषय घेतलाय तेव्हा ब-याचवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: गृहखात्याकडून आढावा घेतला आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार बैठका होत आहेत. तासनतास बैठकीत खलबतं सुरु आहे पण यातून काय निर्णय घेतला जाणार हे महत्वाचं आहे.  मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात आज तब्बल दीड तास बैठक चालली. नेमकं काय करायचं यावर चर्चा सुरु होती लवकर काही आदेश काढून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे पण हे तितकं सोपंही वाटत नाही.  



  • पोलीस महासंचालक आणि सर्व पोलीस आयुक्तांची एक महत्वाची बैठक पार पडेल 

  • या बैठकीत जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल 

  • या सर्वांची पुन्हा माहिती मुख्यमंत्री स्वत: गृहखात्याकडून घेणार  

  • आजच्या बैठकीत राज्यांतील प्रार्थनस्थळावरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना नेमक्या कशाप्रकारे असतील याबाबत चर्चा झाल्याची माहिती


मुंबईत ज्या चार धार्मिक वादाच्या घटना घडल्या याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सद्य स्थिती बाबत गृहमंत्र्यांनी माहिती दिली. सर्वोच्च न्यायलयाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचे सर्वांना पालन करावं लागेल. या सर्वांचं मॅानिटरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: करत आहेत 


एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: जातीनं गृहखात्यात लक्ष देत आहेत. देशभरातल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर
महाविकास आघाडीची एक चूक महागात पडू शकते, तसेच मनसेचं मताचं गणितही शिवसेनेला परवडणारं नाहीय त्यामुळे भोंग्याच्या प्रकरणात गृहखात्यावर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर आहे.