मुंबई : एनसीबी मुंबईने चार जणांना अटक केली असून 4 कोटी रुपयांचा 190 किलो गांजा जप्त केला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्‍या दोन कारही जप्त केल्या आहेत.


चारही आरोपी मुंबईचे रहिवासी असून गेल्या पाच वर्षांपासून मुंबईच्या विविध भागात विशेषतः मुलुंड आणि भांडुपमध्ये गांजा आणि इतर अंमली पदार्थांचा पुरवठा करत होते. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिसातून मोठ्या प्रमाणात येणार असल्याची  माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पडघा, भिवंडी, ठाणे या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना टोल प्लाझावर अडवले. त्यानंतर त्यांच्या वाहनांची चौकशी केली. त्यानंतर  गाडीमध्ये 190 किलो गांजा जप्त करण्यात आला.  या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली. 


आरोपी गेल्या पाच वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात आहेत. ते एजन्सीच्या रडारमध्ये होते आणि वारंवार मोबाईल फोन बदलणे, मालाच्या डिलिव्हरीसाठी एकापेक्षा जास्त वेळा वाहन वापरण्याच्या युक्तीमुळे ते पोलिसांच्या हाती लागले नाही. गांजा लागवडीचे केंद्र असलेल्या आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून गांजा मुंबईत आणला जातो.