Ahmednagar Naming Issue : अहमदनगर जिल्ह्याचे (ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashlok Ahilya Devi Nagar) करावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगरचेही नामांतर होणार का? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. 
 
अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली. नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 532 वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे.  अहमदनगरचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून करण्याची मागणी केली असली तरी यापूर्वीच शिवसेनेकडून अहमदनगरचे नाव 'अंबिकानगर' करावी अशी मागणी झाली आहे. 


अंबिकानगर नावाचीही झाली होती मागणी
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 1995 साली वाडिया पार्क येथे झालेल्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव आजपासून 'अंबिकानगर' झाले असे जाहीर केले होते. तेंव्हापासूनच शिवसेनेने ही मागणी लावून धरली होती. शहरातील विशाल गणपती मंदिरात मिळालेल्या कागदपत्रात शहराचे नाव 'तळीये नगर' असं असल्याची नोंद सापडते. अहमदनगरचे नाव हे 'अंबिकानगर' व्हावे ही मागणी मनसेने देखील केली होती. नगर शहरात रेणुका मातेचे मंदिर आहे, रेणुका माता अर्थात अंबिका मातेवरून शहराचे नाव असावे या मागणीसाठी मनसेने गेल्यावर्षी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी शहरातील कायनेटिक चौकात मनसेकडून अंबिकानगर असे नामकरण केल्याचे फलक देखील लावण्यात आले होते. त्यातच आता आमदार पडळकर यांनी ही मागणी केल्याने नवा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.