सिंधुदुर्ग : संचारबंदी, जिल्हाबंदी आणि त्यामागोमाग लॉकडाऊन लागू करत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठीच राज्य शासन आपल्या परीनं प्रयत्न करत आहे. यामध्ये राज्य शासनानं जिल्हा प्रशासनालाही त्यांच्या पातळीवर निर्णय़ घेण्याची मुभा देऊ केली आहे. त्यामुळं सध्याच्या घडीला राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नियम शिथिल करत काही सेवांमध्ये मुभा देण्यात आली असली तरीही काही जिल्ह्यांमध्ये मात्र अद्यापही हे चित्र पाहायला मिळत नाही आहे.
याचीच प्रचिती येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या खारेपाटण, करूळ, आंबोली, बांदा या भागांतील सीमा अत्यावश्यक सेवा वगळता परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्तींना वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. 1 जून ते 15 जून पर्यंत जिल्हाबंदीचे हे नियम इथं लागू असणार आहेत.
असं असलं तरीही कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय कारणं, अत्यावश्यक / जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक या कारणांसाठी प्रवास करण्याची सूट या नियमांतून देण्यात आली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनीच यासंदर्भातीच आदेश काढले असून, या नियमांतून कार्गो वाहतुकीद्वारे दुकानं/ आस्थापनांच्या वस्तुंच्या वाहतुकीला या निर्बंधांतून वगळण्यात आलं आहे.
मालवाहतुकीस निर्बंध घालण्यात आले नसले तरीही दुकानांनी वेळमर्यादेचं उल्लंघंन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत कोरोनाची साथ संपेपर्यं बंदीची कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटलं गेलं आहे.
रत्नागिरीमध्येही निर्बंध कडक
कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने 2 जून पासून सकाळी 7 वाजल्यापासून ते 8 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मेडिकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान/आस्थापना पुर्णतः बंद राहतील. दुध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत पुरवता येईल.