मुंबई : दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा जोरदार सुरु आहे.  यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका, अशी तंबी देखील सदा सरवणकरांच्या गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा कुठे आणि कसा घ्यायचा याविषयी निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत ही बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी  आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, आपण यंदा दसरा मेळावा जोरात साजरा करायचा आहे.  आपल्याला लवकरच परवानगीही मिळेल त्यामुळे तुम्ही तयारीला लागा. मला एक वर्ष दसरा मेळाव्याची जबाबादारी दिली होती त्यावेळी मी मैदानात मुंगीही शिरणार नाही एवढी गर्दी जमवली होती. दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा.


कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांची तंबी


आपल्याला सोशल मीडियावर बदनाम करत आहेत पण त्यांना कामानं उत्तर द्या  कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका. पोलीस कुटुंबीयांना आपण 15 लाखात घरं दिली.  हा महाराष्ट्रातला  मोठा निर्णय आपण घेतला आहे. जनतेच्या हितासाठी असे अनेक निर्णय सरकारने घेतले असून  ते लोकांपर्यंत पोहचवा.  गद्दारी आपण नाही त्यांनी केली आहे. आपल्याला ते गद्दार बोलतात पण खरे गद्दार ते आहेत कारण निवडणूक एका सोबत लढले आणि सत्ता दुस-यासोबत स्थापन केली. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आपण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. त्यामुळे टीकेला आपल्या कामातून उत्तरे द्या, असे एकनाथ शिंदे  म्हणाले. 


हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मुख्यमंत्री राज्यभर दौरा करणार


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि राज्यात आपला जनाधार वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्याचा दौरा करणार आहेत. हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन मुख्यमंत्री राज्याचा हा दौरा करणार आहे. हिंदू गर्व गर्जना असं एकनाथ शिंदे यांच्या या मोहिमेचं नाव आहे. त्यामुळं शिंदे यांचा हा दौरा हिंदू गर्व गर्जना यात्रा म्हणून ओळखली जाणार आहे.


संबंधित बातम्या :


Shiv Sena vs Shinde Group : शिवतीर्थ की वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्स... शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार?


Shivsena Dasara Melava: आवाज कोणाचा? शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद कोर्टात रंगण्याची शक्यता