Shiv Sena vs Shinde Group  : दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Shinde Group) दोघेही दसरा मेळावा घेण्यावार ठाम आहेत. मुंबईतील शिवतीर्थासाठी दोन्ही बाजूने दबाव निर्माण केला जात आहे. पण शिंदे गटाने दुसरा पर्यायही तयार ठेवला आहे.

  


शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव
शिवतीर्थ की वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्स... शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? याचा फैसला लवकरच होणार आहे. शिवतीर्थावरच मेळावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा दबाव तयार झाला आहे. ज्या मैदानातून बाळासाहेबांनी हिदुत्त्वाचे ज्वलंत विचार साऱ्या देशभर पसरवले, बाळासाहेबांनी ज्या मैदानातून पक्षाची पाळंमुळं रुजवली, ज्या मैदानात बाळासाहेबांचं स्मारक आहे त्याच मैदानातून शिवसैनिकांना  बाळासाहेबांचे विचार द्यायचे यावर शिंदे गट कायम आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार हे आता निश्चित झालं आहे. पण हा मेळावा नेमका कुठे होणार यावर लवकरच एकमत होण्याची शक्यता आहे 


शिवतीर्थासाठी शिवसेनेची कोर्टात जाण्याचीही तयारी
पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी देखील शिवतीर्थावर बोट ठेवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरेने सुरु असलेला दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच झाला पाहिजे यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. म्हणूनच शिंदे गटाने वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्समधील मैदान बुक करुन ठेवलं आहे, जेणेकरुन जागेचा वादात शिवतीर्थ मिळालंच नाही तर दुसऱ्या मैदानावर दसरा मेळावा घ्यायची तयारी शिंदे गटाने पूर्ण केली आहे. 


कोणाचा मेळावा आणि कुठे होणार?
राज्याचं राजकारण हळूहळू बदलत गेलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये परस्पर विरोधी तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरुन पायउतार करत नव्याने सत्ता स्थापन केली. त्यात खरी शिवसेना कोणाची यावर कोर्टात जरी निर्णय प्रलंबित असला तरी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने मात्र आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्याला आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी मात्र आपलीच शिवसेना आणि आपलाच मेळावा असं जाहीर करुन टाकलं आहे.  त्यामुळे नेमका कोणाचा मेळावा आणि कुठे होणार हे लवकरच कळेल.