Prakash Abitkar : किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांना परवडणारा नाही. यामुळे सीपीआरमध्ये किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांना आयोजित बैठकीवेळी केल्या. 


यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये रुग्णालयाला MRI मशीनची आवश्यकता असून त्याकरीता 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती किंवा स्टेट बजेटमध्ये निधीची मागणी करावी, त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. CT स्कॅनचे अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून रुगणांना वेळेत उपचार घेता येतील. जास्तीत-जास्त रुग्णांना डायलेसीस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मशीन वाढवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. 


यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांवर किडणी व लिव्हर ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याने पाठपुरावा करण्याच्या सुचना केल्या. जिल्ह्यातील 48 हजार 777 अपंग प्रस्तावापैकी 18 हजार प्रलंबित असल्याने वेळेत कार्यवाही करावी याकरीता कॅम्प वाढविण्याची सूचना आमदार आबिटकर यांनी केली.


स्त्री रोग विभागात अनागोंदी   


यावेळी आमदार आबिटकर यांनी सीपीआरमधील स्त्री रोग रुग्णविभागास भेट दिली. यावेळी रजिस्टरची पाहणी केली असता अनागोंदी कारभार पहावयास मिळाला. सोनोग्राफीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचे प्रमाण सीपीआरमधून होते, त्यामुळे रुग्णांना पदरमोड करून खासगी ठिकाणी सोनोग्राफी करावी लागते ही बाब गंभीर असल्याचे सांगत त्यांनी तत्काळ सुधारणा करून सोनोग्राफी मशीन वाढवण्याच्या सूचना केल्या. 


राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील नर्सिंगची इमारत वापरात घेणेबाबत कार्यवाही करावी, असेही आबिटकर यांनी सांगितले. 


यावेळी अरुण जाधव, राजेंद्र वाडेकर, बाळासो बेलेकर,राजेंद्र मोरे, अधिष्ठाता डॉ.प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर सरवदे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अनिता सैबनावर, कान नाक व घसा तज्ज्ञ डॉ. अजित लोकरे, शल्यचिकित्सा शास्त्र डॉ.वसंत देशमुख, औषध व वैद्यक शास्त्र डॉ. महेंद्र कुमार बनसोडे, अस्थीव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. राहुल बडे, डॉ. आरती घोरपडे, डॉ. पवन खोत डॉ. भूपेश गायकवाड, डॉ. प्रियेश पाटील, डॉ. मंजीत कुलकर्णी, डॉ. सुजाता, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी अश्विन कुमार चव्हाण उपस्थित होते.