Maharashtra News : स्वातंत्र्यदिन (Independence Day) अवघ्या काही दिवसांवर आहे. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तसेच भक्तांची राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय. राज्यातील धार्मिक स्थळं असोत किंवा पर्यटन स्थळं या ठिकाणी भाविक मनसोक्त सुट्टीचा आनंद घेताना दिसतायत.
शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची गर्दी
सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळं गजबजली आहेत. बुलढाण्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि मंदिर परिसरात राज्यासह पर राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळ पासूनच भाविकांनी संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी तब्बल तीन ते साडे तीन तास लागत आहेत. शेगावातील सर्व खाजगी हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल्ल झाली असून पुढील दोन दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज रविवार असल्याने राज्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील भक्त ही शेगावात दाखल झाले आहेत.
शिर्डी सलग सुट्यांमुळे साई दर्शनासाठी भक्तांची गर्दी
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांना देखील भाविकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. पुढील चार दिवस सलग सुट्टी आहे. त्यामुळे शिर्डीत आज सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे काकड आरतीनंतर दर्शन रांगांमध्ये सुद्धा भक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय. पंधरा मिनिटांत होणाऱ्या दर्शनाला आज तब्बल दोन ते तीन तास लागत असून साई भक्तांनी साई समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून येतेय. साई भक्तांचे दर्शन सुकर व्हावं यासाठी साई संस्थांनी सुद्धा जय्यत तयारी केली असून गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी उसळली आहे. पहाटेपासून मंदिराबाहेर जवळपास 300 मीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. उद्याचा दिवस सोडला तर सलगच्या सुट्ट्या आल्याने भाविकांसह पर्यटकांनी त्र्यंबकेश्वरला पसंती दिली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक धबधबेही प्रवाहित झाले आहेत. इथलं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून उठलं असून प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडतोय. याबरोबरच उत्तर भारतीयांचा श्रावण सध्या सुरू असल्याने परराज्यातील भाविक शंकराच्या दर्शनासाठी दाखल होतायत.
महत्त्वाच्या बातम्या :