13th August Headlines : शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाली. सुमारे साडे तीन तास झालेल्या या बैठकीत विविध मुद्दे चर्चेला आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणावर आजही प्रतिक्रिया येण्याच्या शक्यता आहे. त्याचवेळी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरातल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सोलापुरात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर
शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आज एकाच मंचावर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने दिसणार आहेत. दोघेही काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात दोन दिग्गज नेते आमनेसामने असतील. त्यामुळे राज्याचे लक्ष लागलेय.
पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हे दोघेही एकाच मंचावर होते मात्र यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री , अजितदादा पवार वगैरे सर्वचजण उपस्थित असल्याने या शासकीय कार्यक्रमात टोलेबाजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र सांगोला येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हे दोन नेते आमने सामने येणार असल्याने पहाटेच्या शपथविधीबाबत दोघात रंगलेले आरोप-प्रत्यारोप पुन्हा समोर दिसणार का याची उत्सुकता सर्वांना आहे .
सोलापूर -
सोलापुरातल्या डोणगाव रोड येथे आयटी पार्कचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
सलग सुट्टी, पर्यटक आणि ट्रॅफिक जॅम -
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळ आणि देवस्थानावरील पर्यटकांच्या गर्दीची शक्यता आहे. सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण आपल्या गावी जात असतात. तर काही जण पर्यटन आणि देवस्थानावर जात असतात. त्यामुळे मुंबई –पुणे, मुंबई – गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर तर शनिवारी सकाळपासूनच वाहनांच्या खंडाळा बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
रत्नागिरी - 16 तारखेपर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची पसंती ही कोकणला असणार आहे. सध्या पावसाने देखील विश्रांती घेतलेली आहे. शिवाय कोकणचा निसर्ग सौंदर्य देखील अधिक खुलून गेले आहे. त्यामुळे कोकणात पर्यटकांचा ओघ आणखीन वाढेल.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी आज सकाळी 11 वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड, खासदार सुजय विखे, भाजप आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
नंदुरबार
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा होणार आहे.