पालघर : पालघर जिल्ह्यातील नगरपंचायत यांचे निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले यामध्ये तलासरी नगरपंचायतिच्या 17 प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल महिन्याभराने 19 जानेवारी रोजी तलासरी तहसिलदार कार्यालयात झालेल्या मतमोजणी नंतर जाहीर होताच, नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापण्याची घडामोड जोर धरू लागली आहे. तलासरी नगरपंचायतमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला मिळाले नसल्याने, त्रिशंकू परिस्थिती उभी राहिली असून सत्ता काबीज करण्यासाठी एकमेकांशी हात मिळविण्यावर भर दिला जाणार आहे. नगरपंचायत निकालानुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 6, भाजपाचे 6, सेनेचे 3 तर, अपक्ष जिजाऊ पुरस्कृत तलासरी विकास परिवर्तन पॅनलचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत.


तलासरी नगरपंचायत म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. ग्रामपंचायत ते नगरपंचायत पर्यंतच्या प्रवासापर्यंत माकपची एकहाती सत्ता अबाधित राहिली होती. परंतु, प्रथमच 2021 च्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी स्वबळावर उमेदवार उभे करत, माकपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. 2016 च्या नवनिर्मित नगरपंचायत निवडणुकीत माकपचे 11, भाजप 4 तर, दोम  जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. मागील निवडणुकीच्या तुलनेने भाजपाने दोन जागांवर मुसंडी मारत सहा जागा पटकावल्या, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पाच जागा गमवाव्या लागल्या आहेत. या शिवाय आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला दोन जागा गमावत खातेही उघडता न आल्याने नामुष्की ओढवून घ्यावी लागली आहे. शिवसेनेनेही  प्रभागात 17 उमेदवार उभे करत, प्रथमच तीन उमेदवार विजयी करत खाते उघडले आहे.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अभेद्य बुरुजाला खिंडार पडण्याची महत्त्वाची भूमिका जिजाऊ पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी निभावल्याने मतांच्या विभागणीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अपक्षाने 14 आणि 12 प्रभागातून उमेदवार विजयी करत, इतर प्रभागात मताधिक्य खात माकपला सत्तेपासून रोखण्यात यश मिळवले. नगरपंचायतीच्या प्रभाग 12 मध्ये जिजाऊ संघटनेला माकपचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आणि नंतर माकपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत सामील झालेल्या सुधीर ओझरे गटासोबत असलेल्या व्यक्तीचीही मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुधीर ओझरे यांनी कार्यकर्त्यांसह निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश करत सत्ता परिवर्तनाला कलाटणी दिली होती. परंतु, प्रभाग 17 मधून सेनेने ओझरे कुटुंबातील महिला उमेदवार उभी केल्याने आणि भाजपमधील नाराज सेनेत दाखल झालेल्या आशिर्वाद रिंजड आणि संगीता महाला या उमेदवारांमुळेच सेनेला तीन जागा पटकावता आल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. तर, जिजाऊ संघटनेच्या पॅनल सोबत भाजपची छुपी युती असल्यानेच भाजपच्या अपेक्षित असलेल्या 5,6,9, 7, 15, 16 आणि 17 या प्रभागात जिजाऊ मार्फत उमेदवार उभे केले नसल्याचे बोलले जात आहे.


ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, त्याठिकाणी माकपच्या उमेदवाराची मत विभागणी करत भाजपने बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये असलेल्या सुधीर ओझरेमुळे राष्ट्रवादीला प्रभाग 14 आणि 17 अशा दोन जागांवर विजय मिळवता आला होता. परंतु, सुधीर ओझरे शिवसेनेत दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या दोन जागा गमवाव्या लागल्या असल्या, तरी शिवसेनेच्या ओझरेना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीच्या जोरावर प्रभाग 17 वगळता प्रभाग 14 मध्ये विजय खेचून आणता आला नाही. यावरून 14  प्रभागात अपक्षाने बाजी मारत शिवसेनेच्या ओझरेना धुळच चारल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत अपक्ष आणि शिवसेनेनेच्या उमेदवारांमुळे माकपला तोटा, तर भाजपला मुसंडी मारता आली. याशिवाय माकप व उमेदवारांविषयी असलेली स्थानिकांमधील नाराजी, विकासाचा मुद्दा, नगरपंचायत क्षेत्रातील समस्या याचाही फटका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला बसल्याचे मत विश्लेषक व्यक्त करत आहेत.


सत्तेचे गणित कसे जुळेल?



  • माकप 6 + 3 सेना = 09

  • भाजप 6 + 3 सेना = 09

  • माकप 6 + 6 भाजप + 2 अपक्ष = 14


सध्याच्या निकालावरून सेना किंग मेकरच्या भूमिकेत दिसत असली तरी, सत्ता स्थापन करण्यासाठी रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. मार्क्सवादीच्या प्राबल्याला खिंडार पाडण्यात भाजपसह अपक्षांचा मोठा हात असल्याने माकप भाजप युती होण्याची शक्यता धूसर आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडीनुसार भाजप सेना एकत्र सत्तेत बसण्याची शक्यताही खूपच कमी असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. माकपचा महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा असल्याने माकप सेना सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते. परंतु, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सत्तेसाठी शिवसेना किंवा भाजप सोबत गेल्याने भविष्यात तोटा होण्याची भीती आहे. याच अनुषंगाने विचार केल्यास भाजप सेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यास भाजप मोठा भाऊ या नात्याने शिवसेनेची मुस्कटदाबी करून सेनेच्या वाढत्या प्राबल्याला आळा घालू शकते.


यामुळे वैचारिक, पक्ष नीती, धार्मिक अशा विविध कारणाने एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या पक्षांची सत्तेची गणिती सूत्रे कशी जुळतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच परिस्थिती पाहता सत्तेसाठी घोडेबाजाराला उधाण येणार असून सत्ता स्थापनेनंतर भविष्यात अस्तित्व टिकवणे आवश्यक ठरणार आहे. तर निकाल लागल्यापासून माकप शिवसेनेबरोबर मोट बांधणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून शिवसेनेकडून हे त्याला हिरवा कंदील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर आत्तापर्यंत तलासरी भागात माकपचे भाजपबरोबर जमणे खूप कठीण आहे परंतु माकप शिवसेनेबरोबर आपला संसार थाटू शकते अशी भूमिका माकप आणि शिवसेना या दोघांची असल्याचे मत राजकीय जाणकारांना जाणकारांकडून वर्तवण्यात आले आहेत त्यामुळे आत्ता तलासरी ची सत्ता काबीज कोण करतं हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.