मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात नव्यानं याचिका दाखल केली आहे. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही नवाब मलिक यांच्याकडून पुन्हा बदनामी सुरूच असल्यानं ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात नवी अवमान याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी दिलेली हमी मोडत वानखेडेंबाबत अनावधानानं विधान केल्याबद्दल नवाब मलिकांनी कोर्टाची माफीही मागितली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीय. याआधी उच्च न्यायालयातील खटल्यादरम्यान निकाल लागेपर्यंत वानखेडेंबाबत कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी नबाव मलिकांनी दिलेली असतानाही नवाब मलिकांची वानखेडेंबाबतची विधाने सुरूच आहेत. यामुळे मलिक यांनी न्यायालयाचा पुन्हा अवमान केल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 28 डिसेंबर, 2 आणि 3 जानेवारी रोजी मलिकांनी पुन्हा वानखेडेंबाबत विधानं करत बदनामी केल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेतून केला आहे.
त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाचा वारंवार अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच याचिकेच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल करावा, अशी मागणी वानखेडे यांनी या याचिकेतून केली आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या प्रकरणात माझगाव दंडाधिकारी कोर्टानं बुधवारी नवाब मलिकांना 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला. नवाब मलिकांनी कोर्टापढे रितसर हजेरी लावत हा जामीन मिळवला. मात्र मलिक यांना मोहित कंबोज यांच्याबद्दल भविष्यात कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापासून कोर्टानं मज्जाव केला आहे. तसेच मलिक यांनी कोर्टाची अवमानना केल्यास तक्रारदारास मोहित कंबोज यांना मलिकांना दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करण्यास मुभाही कोर्टानं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'हा' पाहा नवाब मलिकांचा फर्जिवाडा, स्क्रीनशॉट शेअर करत भाजप नेत्याचा गंभीर आरोप
- नवाब मलिकांना मानहानीच्या आणखी एका प्रकरणात दिलासा, कंबोज यांनी दाखल केलेल्या अन्य एका तक्रारीत माझगाव कोर्टाकडून जामीन
- समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढा सुरूच ठेवणार : नवाब मलिक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha